लॉकडाऊनने अनेकांचे कंबरडे मोडले. मात्र, अनेकांनी या काळाकडे संधी म्हणून बघितले. आपल्यातील कलागुणांचा उपयोग करून इतिहास रचण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. नागपुरातील अशाच काही कलावंतांनी एका दीड वर्षांपूर्वी हातात पडलेल्या गाण्याला स्वरसाज चढविला आणि बघता बघता हे गाणे यशोशिखरावर पोहचत आहे.
मूळचा नागपूरचा आणि सध्या मुंबईत स्थायिक होऊ पाहणाऱ्या गौरव चाटी या प्रतिभासंपन्न गायकाने ही किमया केली. समिधा गुरु यांच्या ‘वामांगी’ या शीर्षकाखाली असलेल्या गीताला गाण्यातून प्रत्यक्षात उतरविण्याचे त्याने ठरविले. सिद्धांत करावडे या मित्राने गाण्याला चाल दिली. विपरीत परिस्थितीत गाणे रेकॉर्ड झाले. समिधा गुरु यांना ते गाणे प्रचंड आवडले. त्यांनी मराठी अभिनेता स्वप्नील जोशीला पाठविले. स्वप्नील जोशी यांनी ते गाणे डोक्यावर घेतले. स्वत:च्या पिल्लू टीव्ही ओरिजनलचे ‘लॉन्चिंग’ या गाण्याने करायचे ठरविले. त्यासाठी व्हिडिओ हवा होता. नागपूरच्या या सर्व कलावंतांचे त्याने अभिनंदन केले. व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली. बघता-बघता जुगाड करीत या कलावंतांनी व्हिडिओही तयार केला. हा व्हिडिओ तयार करताना आलेल्या अडचणींवर मात केली. अप्रतिम व्हिडिओचे निर्माण झाले. पिल्लू टीव्ही ओरिजनल या ट्यूब चॅनेलवर तो प्रसारित झाला. या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रभर पसंती मिळते आहे. लॉकडाऊनच्या विपरित परिस्थितीत तयार झालेले हे गाणे अद्भुत ठरले. या गाण्याच्या निर्मितीचा प्रवास मांडण्याचा ‘ऑनलाईन रिपोर्टर’ने केलेला हा प्रयत्न.