Friday, May 3, 2024

Latest Posts

राष्ट्रनिर्माणात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रेरणादायी : ना.नितीन गडकरी

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चे २० शो नि:शुल्क

| TOR News Network | Swatantra Veer Savarkar Free Shows in Nagpur (नागपूर) देशाच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान देश कधिही विसरू शकत नाही. सावरकरांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे बलिदान, त्याग, समर्पण हे सारे अतिशय समर्पकरित्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात अभिनेते रणदीप हुड्डा यांनी साकारले आहे. हा चित्रपट देशातील जनतेला केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर राष्ट्रनिर्माणात तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट व माजी महापौर श्री. संदीप जोशी यांच्यातर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे २० फ्री स्क्रिनिंग करण्यात येत आहेत. यानिमित्ताने मंगळवारी (ता.२६) बैद्यनाथ चौक येथील व्हीआर मॉलमधील सिनेपोलिस येथे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पहिला नि:शुल्क शो दाखविण्यात आला. याप्रसंगी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता श्री. रणदीप हुड्डा, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात सावरकरांची भूमिका जीवंत करण्यासाठी अभिनेते रणदीप हुड्डा यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले व त्यांचे अभिनंदन देखील केले. रणदीप यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील खरेपणा, त्यांची वैचारिक भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये वसविणारे दर्जेदार अभिनय केल्याचेही गौरवोद्गार ना. गडकरी यांनी काढले. याशिवाय जनसामान्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाची महती कळावी, त्यांचे त्याग, बलिदास, तपस्या यापासून प्रेरणा मिळावी यासाठी श्री. संदीप जोशी यांनी नि:शुल्क शो चे आयोजन केल्याबद्दल श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि श्री. संदीप जोशी यांचे देखील केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी अभिनंदन केले.

यापूर्वी अभिनेते श्री. रणदीप हुड्डा यांनी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ‘मीट द प्रेस’मधून पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी रणदीप हुड्डा यांनी, अखंड भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याग, बलिदान, तपस्या ज्यांच्या वाट्याला आली ते सावरकर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातून जाणीवपूर्वक वगळण्यात आले असून इतिहास लपवण्यात आला आणि केवळ विरोध म्हणून वाटेल त्या शब्दांत सावरकरांवर टिका करायची हे तंत्र जपणा-यांनी विरोध करण्याआधी सावरकर वाचावे, अशी मार्मीक टिका केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी सावरकरांसारखे दिसणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सांगड घालणे आवश्यक होते. त्यासाठी ३२ किलो वजन कमी केल्याचे देखील श्री. रणदीप हुड्डा यांनी सांगितले.

प्रारंभी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे यापूर्वी ‘द काश्मीर फाईल’ आणि ‘द केरला स्टोरी’ या दोन चित्रपटांचे नि:शुल्क स्क्रिनिंग केल्याची माहिती दिली. ट्रस्टद्वारे दोन्ही प्रत्येकी ५ हजार नागरिकांना मोफत दोन्ही चित्रपट दाखविण्यात आले. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरा इतिहास, त्यांचे त्याग, बलिदान जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नात श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे योगदान दिले जात आहे. नागपूर शहरात २० शो मोफत दाखविण्यात जाणार आहेत. मंगळवारी (ता.२६) यापुढील शो साठी लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौक येथील कार्यालयातून तिकीटे प्राप्त करण्याचे आवाहन श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss