| TOR News Network |
नागपूर. शहरातील फ्रेंड्स कॉलनी परिसरात अद्यात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. परिसरात घरफोडीचे सत्र सुरु असल्याने स्थानिक नागरिक चिंताग्रस्त आहेत. वारंवार तक्रार करून देखील पोलीस चोरीच्या घटनांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी काटोल रोड येथील फ्रेंड्स कॉलोनी परिसरातील एका घरात चोरट्यांनी हात साफ केला. पोलीस तक्रार करण्यात आली, लवकरच चोरांच्या मुसक्या आवळू असे आश्वासन गिट्टीखदान पोलिसांनी दिले आणि वातावरण शांत झाल. असे असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी त्याच घरी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्लॉट क्रमांक २५५ फ्रेंड्स कॉलोनी, काटोल रोड निवासी अमित शिवराम पंचलवार यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी हात साफ केला. चोरीची घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यावरून तीन अद्यान चोरट्यांनी घरात चोरी केल्याची तक्रार फिर्यादी अमित पंचलवार यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरुवात केली. मात्र, चोरटे काही गवसले नाही.
फिर्यादी अमित पंचलवार हे कामानिमित अमरावती येथे राहतात. त्यांचे वयोवृद्ध वडील शिवराम पंचलवार (वय ७७) घरी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केली. जून महिन्यात पुन्हा त्यांच्या राहत्या घरी चोरीची घटना घडली. शिवराम पंचलवार (वय ७७) पुणे येथे गेले होते. घरी कुणी नसल्याचे बघून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. सकाळी घरकाम करणाऱ्या त्यांच्या मोलकरणीला घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचा संशय आला आणि त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती शिवराम पंचलवार यांना फोनवरून दिली. शिवराम पंचलवार नागपूरला आले, त्यांनी सीसीटीव्ही बघितल्यावर त्यात पुन्हा तीन चोर घरात शिरल्याचे दिसून आले. शिवराम पंचलवार यांनी त्वरित पोलिसात तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही, उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांना घरी पाठवले. चार दिवसांनी पोलिसांनी तक्रार नोंदवली, पण तपास सुरु केला नाही. लागोपाठ दोन वेळा चोरीची घटना घडल्याने परिसरात चिंताग्रस्त वातावरण झाले आहे. पोलीस चोरीच्या घटनांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, चोरट्यांकडून पोलिसांना चिरीमिरी दिली जाते म्हणून पोलीस आपल्या कर्तव्यात कसून करीत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.
व्यक्ती चार क्षण सुखाचे मिळावे म्हणून आयुष्यभराची कमाई लाऊन स्वतःच्या आश्रयाची सोय करतो. त्याला सुरक्षित वातावरण मिळावे याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. पण पोलिसच जर चोरी सारख्या प्रकरणात कानाडोळा करीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी बघावे तरी कुणाकडे, असा सवाल फ्रेंड्स कॉलोनीचे स्थानिक नागरिक करीत आहेत.