संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य सुविधेबाबत सतर्क होण्याची वेळ आली आहे. देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण हळुहळू वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाद्वारे सुरक्षात्मक उपाययोजना जसे, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, खोकताना किंवा शिंकताना रूमाल किंवा टिशूचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती पुन्हा येउ नये म्हणून आरोग्य विभागाद्वारे आधीच सतर्कतेचा इशारा दिला जातो. नागपूर शहरात तर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला अलर्ट केले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी येथील महापालिकेच्या रुग्णालयांमधील सुविधेचा आढावा घेतला. ऑक्सिजन, आयसीयू बेड्सची संख्या, औषधांचा साठा आदींबाबत स्वत: रुग्णालयांमध्ये पाहणी केली व आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपुरात महानगरपालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधी नगर, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि आसोलेशन असे तीन मोठे रुग्णालय आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने मॉकड्रील घेत संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. याशिवाय नागपुरात एम्स, मेडिकल, मेयो यासारखे मोठ्या शासकीय आरोग्य यंत्रणा देखील कोरोनाचा संभाव्य धोका थोपविण्यासाठी सज्ज झाले आहेत.