रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांचा सायरन लहान बाळांच्या आवाजात वाजणार आहे. विशेष म्हणजे काही रुग्ण वाहिकांचा सायरन तर नवजात शिशू रडते तसा असणार आहे. याची अंमलबजावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार असून गरोदर महिलांसाठी ही उपयुक्त ठरणार आहे. माता आणि बाळांना आनंद देणारी 'खिलखिलाट रुग्णवाहिका' सेवा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथे खिलखिलाट रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आता ही सेवा मुंबईत सुरू होणार आहे. या सेवेची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यात केली होती. आता ती प्रत्यक्षात येण्याला सुरुवात झाली आहे. त्याला मुंबईत मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे. ५ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ती मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ही रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे मोफत असेल. या रुग्णवाहिकेचे वातावरण विशेषत: गरोदर महिला व बालकांसाठी आल्हाददायक बनवण्यात आले आहे.
गरोदरपणात काही समस्या असल्यास महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच बालक आजारी असल्यास त्यालाही ही रुग्णवाहिका सेवा मिळू शकणार आहे. ही रुग्णवाहिका आनंददायी वातावरणात रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासोबतच नवजात अर्भकाला रुग्णालयातून घरी आणण्यासही मदत करेल.