राज्यात सध्या उन्हाळा वाढला असून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्या तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच सर्वत्र आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या काळात प्रचंड उन्हाच्या झळांचा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच वाढत्या पाऱ्यामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. हिंगोलीत उष्माघाताने एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू झालाय. नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला.
मुलीला अचानक ताप आणि उलटी जुलाब सुरु झाल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र तीव्र ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिला उष्माघात झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळी तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे.
उष्णतेपासून लहान मुलांची काळजी कशी घ्याल…
- जर मुलाला बाहेर शाळेत पाठवत असाल तर त्याच्यासोबत पाण्याची बाटली जरूर द्यावी
- रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी टोपी घालण्यास द्यावी
- मुलांच्या शरीरात पाणी कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावं. यावेळी ताज्या फळांचा रस किंवा लिंबूपाणी प्यायला दिलं पाहिजे.
- सुती कपडे घालण्यास प्राधान्य द्यावं
- मुलांना घरातील पदार्थ खाण्यास द्यावेत
- हलका जरी ताप आला तरी मुलांना डॉक्टरांकडे न्यावं