| TOR News Network |
Jaaniv – Article By Vina Randive (Valentine’s Day Special)
प्रिय अनिरुद्ध,
“माझ्याशिवाय तुझं काही अडेल काय?”… हा प्रश्न जेव्हा मी स्वतःलाच विचारते तेव्हा त्याचे उत्तर मला ठामपणे ‘होय’ असे देता येत नाही.
मात्र “तुझ्याशिवाय माझं काही अडेल काय?”… या प्रश्नाचे उत्तर मात्र मी ठामपणे ‘होय’ असे देऊ शकते.
मूलतःहाच फरक आहे स्त्री आणि पुरुष विचारसरणीचा!
‘वीर-जारा’ या सिनेमात एक संवाद आहे. त्यात जारा आपल्या अम्मीला विचारते,” तू अब्बाजानकरिता आपला जीव पणाला लावू शकतेस?”... अम्मी, अगदी ठामपणे ‘होय’ असे उत्तर देते. तेव्हाच जारा दुसऱ्या प्रश्नाचा बाण फेकते,” तर मग अब्बाजान तुझ्याकरिता आपला जीव देऊ शकतात?” (“अपनी जान आपके लिए दे सकते है अम्मी?….) त्यावर अम्मीजान अडखळते. तिला ठामपणे या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
तुझ्या नि माझ्या बाबत हेच तत्व लागू होतं. आज वयाच्या या टप्प्यावर वळून पाहताना, आठवांचे हिंदोळे हेलकावे घेतात. त्या हेलकाव्यांना बरेचदा तडजोडीच्या दोरखंडांनी बांधल्याने, त्या कडू-गोड क्षणांना घेऊन इथवर पोहोचलोय आपण!
कधी असं वाटतं… तुझ्या मते आयुष्य म्हणजे दोन वेळचे जेवण, ऑफिसची दगदग आणि जराशी करमणूक बस! उजाडले की सकाळ, मावळले की रात्र. फक्त जगरहाटी!
याकरिताच असतो का सहजीवनाचा अट्टाहास! आपल्या सहचारिणीचे मन तिच्याही नकळत, का जाणून घेऊ शकत नाहीस तू? ती रागावली, चिडली, अबोल झाली तर तेवढ्याच तीव्रतेने, आपणही रागवायचं?? का पुरुषी अहंकार आड येतो इथे??
तिचा अबोला दूर करण्याने, जर तिच्या चेहऱ्यावर हास्य उमलत असेल तर तिला मनवण्यात कमीपणा तो कसला?
इथे स्त्री हळवी आणि पुरुष कठोर, असा लिंगभेद का? स्त्री इतकीच पुरुषालाही स्त्रीची गरज, स्त्रीचा आधार हवा असू नये? मग त्याने देखील तिच्याबाबत संवेदनशील असावेच ना?
साध्या हळुवार स्पर्शाची गरज जर तिच्या विस्कटलेल्या मनावर, फुंकर घालण्याचे काम करीत असेल तर तो निस्वार्थ स्पर्श का म्हणून स्वतःहून देऊ नये?…
स्पर्शसुखाची परिणती परमोच्च क्षणातच व्हावी, हा पुरुषी नियम प्रत्येक वेळी, प्रत्येक वयात लागू होत नाही. त्याकरिता तुझ्या-माझ्या संबंधांमध्ये शारीरिक विलगीकरण होणे, सोबतच मानसिक दुरावलेपण निर्माण होणे, यासारखा विपर्यास नाही.
हळूच आलिंगनाचा विळखा घालून प्रेमभावना उद्दीपित करणे, एखाद्या निवांत क्षणी फक्त स्पर्शाची ऊब, चुंबनाची नशा..आजही सर्वांगावर मोरपीस फिरवू शकते, मनाची काजळी दूर करून त्या नशेची चमक डोळ्यात उतरवू शकते. या छोट्या छोट्या तरल क्षणांना घेऊन रटाळवाणी संसाराची नाव, सुखद स्वप्निल आनंददायी ठरू शकते.
आनंदयात्री बनून छोटे छोटे आनंदाचे क्षण तू माझ्यासोबत अनुभव! अगदी पाऊस पडतांना, हातावर थेंबांना झेलत, एखादे किशोरचे खट्याळ गाणे गा!…त्या सरींना मनात साठवून, ओलेत्या मनाला जिवंत ठेवत, प्रत्येक वेळी आलेली मरगळ धुऊन काढेल मी!
पानांवरचे दवबिंदू, कशी पानावरची धूळ साफ करीत, पर्णरेशमी चमक प्रदान करतात. अगदी तसेच हे ओले मन कोरडे होणार नाही, याची काळजी तू घ्यायला हवीस ना?
अरे! उगाच कधी भेटवस्तू देऊन बघ… कधी सरप्राईज आउटिंग प्लॅन करून बघ… तो आश्चर्याचा सुखद धक्का, आठवांच्या पानांवर घट्ट रोवला जातो.
कधी हातात हात घालून शतपावली करून बघ. कधी तिच्याजवळ बसून, तिच्या मनातल्या जाणिवा जाणवून बघ. मनातल्या आठवणीचा बांध मोकळा होऊ दे तुझ्या कुशीत! प्रत्येक वेळी तिने स्वतःच स्वतःला सावरायचं? समजायचं, समजवायचं?
पास आईयें की हम नही आयेंगे बार बार…
बाहे गलें में डालियें हम रो ले जार जार…
असे असावे रे सहजीवन!
एवढी विचारात मतभिन्नता घेऊन चालताना हा वयाचा टप्पा नकोसा वाटतो मग! इथे सगळंच थांबलेलं! ना कसले ध्येय ना कसले आव्हान,ना कोणते स्वप्न…. सारे काही चढ उतार अनुभवल्यावर या टप्प्यावर तुझं माझ्याशिवाय आणि माझं तुझ्याशिवाय अडायलाच हवं.त्याकरिता जगण्याचं रुटीन बदलायला हवं. रटाळवाण्या जगण्याला निवांत क्षण अनुभवू द्यावेत. सोबतीने सोबत घेऊन, मखमली अनुभवांची चादर स्वतःहून एकमेकांवर पांघरायला हवी. नाहीतर मग आजच्या वर्तमान जगरहाटी प्रमाणे टी टी एम एम – तेरा तू मेरा मै, हे तत्व आपल्या नात्यालाही लागू होईल. तसं झालं तर तुझं काही अडणार नाही. तुला अलिप्त राहता येईल. पण माझं काय?
सावली बनून चालता चालता, सावली होऊनच जगले. त्या सावलीने साथ सोडली तर भावविश्वात खळबळ निर्माण होईल. आता तू तिची सावली बनून बघ! तिच्या पंखातील शक्तीला, पुनर्भरारी घ्यायला मानसिक बळ दे. तिच्या एकाकीपणाच्या निर्वात पोकळीला, आनंदी क्षणांनी भरून काढ.
आयुष्यभर तुझ्यासोबत काटेरी पायवाटेवर चालताना तिने तुझी साथ सोडली नाही. आज या टप्प्यावर तिचे मन जपून, “तिच्याशिवाय तुझे ही अडते” ही ‘जाणीव’ तिच्यात होऊ दे.
जिथे सागरा धरणी मिळते….
तिथे तुझी ती वाट पाहते… वाट पाहते…
तुझीच सहचारिणी,
अनुराधा.
वीणा विजय रणदिवे
नागपूर.
+91 99694 56600