दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक
Bihar Political Changes News : बिहारमध्ये सध्या राजकीय गदारोळ सुरु झालेला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. (Nitish Kumar Cm From BJP) त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा हादरा बसणार असून त्यानिमित्ताने भाजप पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हं निर्माण झालीत.
भाजपमध्येही मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये पक्षाची एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. रात्री उशिरा ही बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि इतर नेत्यांची उपस्थिती आहे. तसेच बीएल संतोष, विनोद तावडे हेदेखील बैठकीला हजर आहेत.
केवळ दिल्लीतच नाहीतर बिहारमध्येदेखील बैठकांवर बैठका सुरु आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदारदेखील सहभागी होणार आहेत. जर लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचा विचार केला तर तिथेही बैठकांचा सपाटा सुरुच आहे.भाजपच्या जवळचे आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे सुपुत्र संतोष कुमार सुमन यांनी सांगितलं की, बिहार सरकार एक ते दोन दिवसांमध्ये कोसळू शकतं. राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात राहणार नाही. नितीश कुमारांचं घराणेशाहीवरचं विधान काँग्रेस आणि राजद यांना उद्देशून होतं, असाही दावा त्यांनी केला.
सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. (Nitish Kumar Support BJP Again ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे २८ तारखेला भाजपसोबत पदाची शपथ घेऊ शकतात. नितीश कुमार भाजपसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. (Nitish Kumar Cm Oath News) भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.
इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का
इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतंत्रपणे लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता नितीश कुमार भाजपसोबत गेले तर इंडिया आघाडीची मोठी पिछेहाट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.