Saturday, January 11, 2025

Latest Posts

भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका गुलाबी जर्सीत का ?

जाणून घ्या काय आहे त्या मागचे कारणे

South Africa In Pink Jersey Vs India ODI 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत सोडवल्यानंतर, आजपासून म्हणजेच १७ डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करुन मैदानात उतरला आहे, (South Africa’s ODI history in Pink Jersey) या मागे नक्की काय कारण आहे जाणून घेऊया.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्यात, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ त्याच्या नियमित हिरव्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सीमध्ये दिसला. दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीच्या रंगात हा बदल पिंक डे वनडे आयोजित करण्याच्या त्यांच्या परंपरेचा भाग आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ ‘पिंक डे वनडे’ मध्ये गुलाबी जर्सी परिधान करून स्तन कर्करोगाचे शिक्षण, जागरूकता, संशोधन आणि शोध यासाठी आपला पाठिंबा दर्शवतो.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) चे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी पिंक डे वनडेबद्दल म्हणाले, “आम्हाला पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांसोबत स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करताना आनंद होत आहे. स्तनाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात केवळ जागरूकता पुरेशी नाही. आम्ही लोकांना स्तनाच्या कर्करोगाबाबत सक्रिय होण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, परंतु त्याचा परिणाम पुरुषांवरही होऊ शकतो. याचे लवकर निदान झाल्यास, उपचार सकारात्मक परिणाम देऊ शकतात.”

गुलाबी जर्सीत आफ्रिकेचा एकदिवसीय इतिहास

गुलाबी जर्सी मधील दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. प्रोटीज संघाने गुलाबी जर्सीमध्ये आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत. दरम्यान, संघाने १० सामने जिंकले आहेत, तर केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विरोधी संघाचा हा उत्कृष्ट विक्रम भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे.

Latest Posts

Don't Miss