Saturday, January 11, 2025

Latest Posts

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा

बहुतांश जागांवर सहमती, काँग्रेस- राष्ट्रवादीत समान वाटप

Mahavikas Aghadi Seat Allocation News : आगामी लोकभेसाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षनेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत बहुतांश जागांवर सहमती झाली असून शिवसेनेच्या ठाकरे गटाला सर्वाधिक जागा दिल्या जाणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट हाच मोठा भाऊ असेल, हे जवळपास निश्चित असून उर्वरित जागांचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये समसमान वाटप होण्याची शक्यता आहे. काही जागासंदर्भात तिढा कायम असून दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेमध्ये सोडवला जाणार आहे. (Loksabha Seat Allocation in Mahavikas aghadi)

काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे समन्वयक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुमारे अडीच तास बैठक झाली. या बैठकीला वासनिक यांच्यासह अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड व शिवसेनेच्या वतीने संजय राऊत, विनायक राऊत आदी राज्यांतील नेते उपस्थित होते. ठाकरे गटाने २३ जागांची तर, काँग्रेसने २३ हून अधिक जागांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील जागावाटपामध्ये मुख्यत्वे शिवसेना व काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे. वासनिक यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेमध्ये प्रामुख्याने याच दोन पक्षांच्या नेत्यांची जागांसंदर्भात देवाणघेवाण झाल्याचे समजते. ‘गेल्या वेळी आम्ही २३ जागा लढवल्या असल्यामुळे यावेळीही तितक्याच जागांची मागणी केली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली असली तरी, शिवसेनेचा मूळ मतदार आमच्या पासून दूर गेला असे नव्हे’, असा युक्तिवाद करत शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जागावाटपातील हिस्सेदारीचे समर्थन केले होते. ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार असून त्यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये शिक्कमोर्तब केले जाऊ शकेल.

वंचित’ला कोणाच्या कोट्यातून जागा ?

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याची माहिती राऊत यांनी दिली. वंचितसह शेकाप, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनाही महाविकास आघाडीमध्ये सामावून घेतले जाणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून हातकणंगलेतील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना दिली जाऊ शकते. ‘वंचित’ला कोणाच्या कोट्यातून जागा द्यायचा याचा निर्णय झालेला नाही. ‘वंचित’ला एक वा दोन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. शेकाप व डाव्या पक्षांना लोकसभेत जागा न देता विधानसभा व विधान परिषदेमध्ये सहकार्य केले जाईल.

‘राष्ट्रवादी’ची १४ जागांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रसने १४ जागांची मागणी केल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या रायगड, मावळ, भंडारा या जागा पक्ष सोडून देण्याची शक्यता आहे. रायगड व मावळ या दोन्ही जागा शिवसेना (ठाकरे गट) लढवण्याची शक्यता आहे. त्याऐवजी नगर-दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. या मतदारसंघातून रोहित पवारांना उमेदवारी दिली जाऊ शकते. असे झाले तर या मतदारसंघातून सुजय विखे-पाटील व रोहित पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस लढवणाऱ्या जागांवर शिवसेना दावा करणार नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Latest Posts

Don't Miss