नागपूर विद्यापीठ भाजयुमोच्या आंदोलनापुढे झुकले
नागपूर. राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासण्याच्या प्रकरणात दोन दिवसांच्या पोलिस कोठडीतून जामीनावर बाहेर आलेल्या कुणाल राऊतांवर दुसरा गुन्हा दाखल झाला.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात 1 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढे याच जागेवर शुद्धीकरण करण्यात आले होते. मात्र आज गुरूवारी विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी आत घुसले आणि कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी आंदोलन करीत विद्यापीठाची सभा उधळून लावली.
1 फेब्रुवारीला सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनानंतर देखील दुस-या दिवशी भाजपा युवा मोर्चाद्वारे आंदोलन करून कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी प्र-कुलगुरूंनी अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये फोनकरून तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतरही गुन्हा नोंदविला गेला नसल्याने आज भाजपा युवा मोर्चाने कठोर पवित्रा घेत सभा उधळून लावली. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांच्या मागणीपुढे विद्यापीठ प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं. कुलसचिव राजू हिवसे यांनी स्वत: अंबाझरी पोलिस स्टेशनला जाउन तक्रार दिली व त्यावरून पोलिसांनी कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला.