Saturday, January 11, 2025

Latest Posts

संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? २२ वर्षानंतर संसदेवर हल्ल्याची पुनरावृत्ती

Security Breach In Indian Parliament News : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एक मोठी घटना आज घडली. आजपासून २२ वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेनंतर संसदेची सुरक्षा अगदी कडेकोट करण्यात आल्याचे अनेकदा दर्शविण्यात आले. मात्र अगदी २२ वर्षांनी हल्ल्याच्या आठवणी जाग्या करण्याचा थरारक प्रयत्न संसदेत झाला. थेट लोकसभेत खासदारांच्या मध्ये जात दोन व्यक्तींनी स्मोक बॉम्बचा वापर करून संसदेत धूर सोडला.

संसेदेचे थेट प्रसारण सुरू असताना घडलेला हा थरार संपूर्ण देशाने अनुभवला. पण ते स्मोक बॉम्ब ऐवजी खरोखरचे बॉम्ब असते तर? अतिशय संवेदनशील परिसर असलेल्या संसदेच्या परिसरात सहजासहजी कुणालाही प्रवेश मिळत नाही. अशात दोन व्यक्ती थेट सभागृहात जाउन अशा विघातक कृती करत असेल तर मग संसदेच्या संपूर्ण सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.

पहिल्यांदा संसद भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काही वेळातच लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी सुरक्षा कठडा तोडून सभागृहात प्रवेश केला. दोन्ही प्रेक्षकांनी गॅलरीतून उड्या मारल्या होत्या. या घटनेने २२ वर्षे जुन्या दहशतवादी घटनेची पुन्हा एकदा आठवण करून दिली. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय संसदेच्या संकुलावर हल्ला केला होता आणि गोळ्यांच्या सरींनी देश होरपळला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेक दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांसह ९ जण शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी पाचही दहशतवाद्यांना ठार केले. (Parliament Attack)

याशिवाय काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने संसद भवनावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. १३ डिसेंबर रोजी दिल्लीतील संसद भवनावर हल्ला करून प्रत्युत्तर देऊ, असा व्हिडिओ त्यांनी जारी केला होता. अशा परिस्थितीत संसदेची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट होती. मात्र तरीही दोन आंदोलक संसदेबाहेर पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याच्या हातात अश्रुधुराची डबी होती. मात्र, काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्यांच्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री होती. मात्र, काही वेळानंतर पुन्हा सुरक्षेमध्ये गडबड झाली.

यावेळी दोन तरुणांनी लोकसभेत प्रवेश केला. ज्याला पाहून सभागृहात उपस्थित खासदार आश्चर्यचकित झाले. घटनेची माहिती देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले – दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारली आणि त्यांनी काहीतरी फेकले ज्यामुळे गॅस बाहेर येत होता. त्याला खासदारांनी पकडले आणि नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले.

संसदेबाहेर झालेल्या या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नीलम आणि अनमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. नीलम ही महिला असून तिचे वय ४२ वर्षे आहे. ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. तर दुसरा आरोपी अनमोल हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. त्याचे वय २५ वर्षे आहे. तर लोकसभेमध्ये प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारलेल्या तरुणाचे नाव सागर आहे. तो पोलिसांच्या अटकेत आहे. दिल्ली पोलिसांसोबतच आयबीची चमू या सर्वांची कसून चौकशी करत आहे.

Latest Posts

Don't Miss