आमदार रोहित पवारांचे मोठे विधान
Rohit Pawar Latest News : भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची इच्छा शरद पवारांची होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी कर्जतच्या मेळाव्यात केला होता. पण शरद पवारांनी अजित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी मला पहिल्यांदाच समजत आहेत, असं पवारांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठे विधान केले आहे.(Rohit Pawar Reaction On Ajit Pawar Claim About Sharad Pawar Willing To Go With Bjp Govt)
रोहित पवार म्हणाले, भाजपाबरोबर जाण्याचं शरद पवारांनी कधीच सांगितलं नाही. अजित पवार आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा कुणाची होती आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे., असंही रोहित पवार म्हणाले. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवारांच्या विविध गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, त्यांनी कुठले कुठले खुलासे केले, हे मला माहीत नाही. कारण जी भाषणं संविधानाला धरून आणि विचाराला धरून असतात, तीच भाषणं आम्ही ऐकत असतो. आता ते तिकडे गेल्यामुळे त्यांची भाषणं आम्हाला पटत नाहीत आणि समजतही नाहीत. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय शरद पवारांचा असता, तर आमची संपूर्ण राष्ट्रवादी पार्टी भाजपाबरोबर सत्तेत गेली असती. पण ती तशीच आहे. आम्ही त्यांच्याबरोबर (शरद पवार) आहोत. अजित पवार आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे भाजपाबरोबर जाण्याची इच्छा कुणाची होती? आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे.