Saturday, November 16, 2024

Latest Posts

रुबरू रोशनी

| TOR News Network |

“Repay no one evil for evil, but give thought to do what is honorable in the sight of all..”

Rubaru Roshni Cinema Blog : काही गोष्टी ऐकायला वाचायला फार बऱ्या वाटतात, पण त्या प्रत्यक्षात करण्याची वेळ येते तेव्हा ते असे वागणे कितपत जमते ? जमले पाहिजे…जमवायला हवे !आयुष्यात एखादी भयंकर धक्कादायक घटना घडते आणि माणूस जवळजवळ उध्दवस्त होतो. इतकं भयंकर दुःख येऊन ठेपलेलं असतं कि त्यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही. या दुःखाची सल इतकी बोचरी असते ती सहनशीलतेच्या सगळ्या मर्यादा लंघून संपूर्ण आयुष्यावरच मळभ पसरते. काळोख काळोख दिसत राहतो सगळीकडे. आपल्याला या परिस्थितीत ज्यानं ढकललं त्याचा द्वेष, राग, सूड अशा अनेक विचारांनी मनाची स्थिती अधिक अधिक बिघडत जाते. शारीरिक मानसिक भावनिक सगळ्या स्तरावर खचलेल्या माणसाला पुन्हा पाहिलेसारखं साधारण जीवन जगणंच कठीण होऊन बसतं. या अशा परिस्थितीतून बाहेर निघायला उपाय काय असतो ? तर सेल्फ हीलिंग !

सेल्फ हीलिंग !

सेल्फ हीलिंग म्हणजे केवळ अंतःप्रेरणेने प्रयत्नपूर्वक स्वतःवर उपचार करून पुनःप्राप्ती करून घेणे. स्वप्रेरणेने स्वतःला एखाद्या विशिष्ट अप्रिय परिस्थितीतून बाहेर काढून झालेल्या जखमांवर फुंकर आणि उपचार करणाऱ्या परिस्थितीत घेऊन जाणे. ह्यासाठी सगळ्यात उपयुक्त उपचार कुठला असेल तर तो आहे ‘क्षमा’. आपल्या परिस्थितीसाठी, दुःखासाठी कारणीभूत असलेल्या माणसांना क्षमा करून टाकणे ही सेल्फ हीलिंग प्रक्रियेतली महत्वाची पायरी आहे. क्षमा करणं म्हणजे स्वीकारणं..स्वीकार स्वतःचा, इतरांचा, त्यांच्या परिस्थितीचा आणि आता आहे त्या आपल्या परिस्थितीचा. क्षमा द्वेषाचा नायनाट करते!

आज हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे, गेल्या रविवारी रात्री नेटफ्लिक्सवर ‘रुबरू रोशनी’ ही डॉक्युमेंटरी पाहिली. रुबरू रोशनी हा स्वाती चक्रवर्ती भटकळ दिग्दर्शित 2019 चा भारतीय माहितीपट आहे. आमिर खान यांची संकल्पना आणि किरण राव निर्मित गुन्हेगारांच्या माफीच्या मार्मिक वास्तविक करुणामय कथा असलेली ही डॉक्युमेंटरी अनंतच्या खूप खोलवर स्पर्श करण्याची कल्पना आहे.

आकाशात ढग जमा होतात, कोंदट हवामान तयार होते तेव्हा पाऊस पडल्या शिवाय सुटका होत नाही तसेच या मनाच्या अवस्थेचे आहे. निरभ्र आकाश तसेच निर्मळ मन क्षमा मागितल्याने किंवा केल्याने होते. क्षमा या शब्दाला तसे अनेक कंगोरे आहेत, अनके बाजू आहेत. पण अंतर्मनातून माफ करण्याची प्रक्रिया ही आयुष्य बदलाची प्रक्रिया ठरू शकते ही अनुभूती घ्यायची असेल रुबरु रोशनी पाहायलाच हवा. या चित्रपटात तीन सत्यकथा आहेत.. हत्येच्या कथा. सर्वांचा समान धागा आहे, क्षमा.. एक भावनिक रोलरकोस्टर. तीनही घटनांमध्ये नाण्याच्या दोन्ही बाजू दाखविल्याने सिनेमा ‘नॉन-जमेंटल’ होतो..तीनही कथा वेगवेगळ्या दशकातील आहेत त्यामुळे काळानुसार होणारे बदल टिपता येतात. कथानक आणि वेग गुंतवून ठेवते. अतिशय हृदयस्पर्शी आणि साहजिकच आयुष्य बदलून टाकणारा आशय. या चित्रपटाच्या सर्व टीमने उत्तम काम केले आहे. कोणत्याही वर्गीकरण किंवा भेदाची पर्वा न करता प्रत्येक माणसाने मरण्यापूर्वी हा चित्रपट पाहिला पाहिजे.

कुणीतरी हत्या केली म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला गमावलेल्या कुटुंबातील सदस्य आणि हत्या करणारा आरोपी यांच्यातील संबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. प्रत्येक कथा आपल्या शत्रूंना क्षमा करण्यास तयार असलेल्या लोकांच्या कृपेचा, करुणेचा आणि खुल्या मनाचा संदेश देते..हा इतरांना क्षमा करण्याचाच विषय नाहीये तर स्वतःला त्या दुःखातून बाहेर काढून, स्वयंप्रेरणेने स्वतःवर उपचार करून घेण्याचाही विषय आहे. हा एक चित्रपट आहे जो आपल्याला चिंतन करण्यास भाग पाडेल. जीवनात घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न विचारण्यास भाग पाडेल आणि थोडी क्षमा केल्याने इतरांसह स्वतःचे जीवन कसे बदलू शकते ह्याचे तादात्म्याच्या स्तरावर चिंतन करण्यास भाग पडणारा हा चित्रपट हे दर्शविते की क्षमा करणे माणसाला कसे मजबूत बनवू शकते आणि सूडाची भावना त्यालाच कशी कमकुवत बनवत जाते. .रुबरू रोशनी हा असा भावनिक आणि हृदयस्पर्शी माहितीपट आहे ज्याला प्रत्येकाने पाहायलाच हवा.

रुबरू रोशनी माहितीपटात जे दाखवले आहे ते पचवणे खरतर जरा कठीणच वाटते…पण एक वस्तुस्थिती म्हणून असे सिनेमे बनवण्याचे धाडस फक्त अमीर खानच करू जाणे..अमीर खान एक कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि जबाबदार चित्रपट निर्माता आहे त्याचे कौतुक केलेच पाहिजे. सक्तीच्या गुन्ह्यांची सामाजिक कोंडी रेकॉर्डवर आणण्याचा एक उत्तम प्रयत्न आमिरने केला आहे.

काही गोष्टी त्या त्या वळणावर येऊन माफ करून सोडून द्यायला शिकले पाहिजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाला गाठीला बांधून घेऊन आयुष्याच्या शेवटपर्यंत पोचता येत नाही..हेच खरे.

रुबरू रोशनी एकदा पहाच !!

– रश्मी पदवाड मदनकर  
                                                      7720001132 

Latest Posts

Don't Miss