Sunday, January 12, 2025

Latest Posts

नवी बुद्ध मूर्ती स्थानांतरीत करून दीक्षाभूमीवर रमाईंचा पुतळा बसवा

| TOR News Network |

| Relocate The New Buddha Statue & Install Ramai’s Statue On Diksha Bhoomi | नागपूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या जागतिक कीर्तिच्या पवित्र दीक्षाभूमीवर भगवान बुद्धांच्या 56 फुट उंचीच्या नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीवर सध्यस्थितीत भगवान बुद्धांच्या एकूण 5 मूर्ती असून कुठलीही मागणी नसताना नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. ही नवीन 56 फुटाची मूर्ती इतरत्र स्थानांतरीत करून दीक्षाभूमीवर माता रमाईंचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी नागपुरातील बौद्धांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

धंतोली येथील टिळक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी, सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी खैरकर, संजय मून, नरेश गायकवाड, प्रमिलाताई टेंभेकर, ज्योती बेले, एडवोकेट स्मिताताई ताकसांडे, मनीषा भगत, तरुलता कांबळे आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी यांनी सांगितले की, नागपूरच्या दीक्षाभूमीवर थायलंड येथून आलेली 56 फुट उंचीची भगवान बुद्धांची मूर्ती बसविण्याची स्मारक समितीची घोषणा पूर्णतः चुकीचीं असून बौद्ध समाजात आनंदासोबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भगवान बुद्धाच्या मूर्तीचा विरोध कोणताही बौद्ध करणार नाही परंतू दीक्षाभूमीवर स्तूपाच्या आत बाबासाहेबांच्या अस्थींसोबत भगवान बुद्धाची मूर्ती स्मारकाच्या आतमध्ये आहे. सोबतच पुन्हा एक बुद्ध मुर्ती उभी आहे. स्मारकाच्या बाहेर बाबासाहेबांच्या पुतळयासोबत बुद्धाची भव्य मोठी मूर्ती विराजमान आहे. स्तूपाच्या डोममध्ये एक मूर्ती वरच्या माळ्यावर वंदनार्थ ठेवलेली आहे. अशा भगवान बुद्धांच्या एकूण 5 भव्य मूर्ती असताना पुन्हा नवी 56 फुट उंचीची बुद्ध मूर्ती कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी खैरकर म्हणाले, दीक्षाभूमीवरील भगवान बुद्धाच्या सर्व मूर्ती थायलंड या बौद्ध देशातूनच आलेल्या आहेत, हे विशेष. 56 फुट उंच मूर्तीसाठी दोन एकर जागेची आवश्यकता आहे. सौंदर्यीकरणासाठी देखील मोठी जागा लागेल. अशात दीक्षाभूमीवर एवढी मोठी जागा कुठे आहे, असा प्रश्न करतानाच खैरकर यांनी एवढी मोठी मूर्ती बोलविण्याचे प्रयोजन कशासाठी व कोणी ही मूर्ती बोलविली आहे? अगोदरच 5 मूर्ती दीक्षाभूमीवर असताना 56 फुट उंचीची बुद्ध मूर्ती आणण्याची गरज काय, आदी प्रश्नही मांडले. स्मारक समितीच्या पदाधिका-यांकडे चौकशी केली असता याबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. स्मारक समितीची यासंदर्भात बैठक देखील झालेली नाही, मग 56 फुट मूर्तीचा निर्णय कोणी घेतला, दीक्षाभूमीवर वाट्टेल तो निर्णय घेण्याचा अधिकार कुणाकडे आहे?, अशा प्रश्नांच्या फैरी त्यांनी झाडल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माता रमाईंचे योगदान हिमालयाएवढे विशाल आहे. बाबासाहेबांनी नवे पंढपूर वसविण्याचे रमाईंना दिलेले वचन म्हणजे दीक्षाभूमी आहे. या दीक्षाभूमीवर रमाईंचा पुतळा बसविण्याबाबत स्मारक समितीने निर्णय घ्यावा व नवी बुद्ध मूर्ती इतर बुद्धीस्ट स्थळांवर आदराने स्थानांतरीत करावी, अशी देखील मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Latest Posts

Don't Miss