Prague University Gun Firing News : अतिशय संपन्न असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या प्रागमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्याने तो शिकत असलेल्या विद्यापीठातच हा गोळीबार केला असून या सगळ्या धुमश्चक्रीत त्याचाही मृत्यू झाला आहे. त्यानं आत्महत्या केली की पोलिसांच्याच गोळीबारात तो ठार झाला, याचा तपास पोलीस करत असल्याचं वृत्त आहे. (Prague University Firing Gunman Killed 14 People Latest News )
नेमकं काय घडलं?
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुरुवारी झेक प्रजासत्ताकमधील प्रतिष्ठित प्राग विद्यापीठात घडली. २४ वर्षीय हल्लेखोर तरुणानं आधी त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तो प्राग विद्यापीठात शिरला आणि मुख्य इमारतीत त्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात इमारतीतील १३ जणांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांशी झालेल्या धुमश्चक्रीमध्ये स्वत: हल्लेखोरही ठार झाला आहे. या घटनेनंतर झेक प्रजासत्ताक सरकारनं २३ डिसेंबर रोजी एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे.
घटनेनंतर पोलिसांना प्राग विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खालच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गोळ्या सापडल्या. हल्लेखोर तरुण क्लाडगो भागातील त्याच्या घरातून निघाला असून तो आत्महत्या करू शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्याच्या शोधात निघालेही. मात्र, काही मिनिटांतच या तरुणाच्या वडिलांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने प्राग विद्यापीठात धाव घेत तेथील कला विभागाची इमारत रिकामी केली. हल्लेखोर तिथे एक लेक्चर ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.