शहरात हंगामातील सर्वात थंड दिवसाची नोंद; विदर्भातील दुसरे थंड शहर
Nagpur Weather News : कोरड्या हवामानामुळे नागपुरातील नागरिकांना थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. गेल्या 24 तासांत किमान तापमान 4.3 अंश सेल्सिअसने घसरून 12.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले, त्यामुळे हा हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला. सध्या शहराच्या आकाशातून ढग गायब झाले आहेत. उर्वरित आठवडाभर आकाश निरभ्र राहील. तापमान 12 ते 13 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भातील गोंदियामध्ये 12.6 अंश इतके थंड तापमान होते. थंडीच्या बाबतीत नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पूर्व अरबी समुद्रापासून मालदीवपर्यंत चक्रीवादळ तयार झाले आहे. मात्र, विदर्भ किंवा मध्य भारतात त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. 11 डिसेंबरपासून हिमालयीन प्रदेशात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स विकसित होईल. मात्र, मध्य भारतात त्याचा प्रभाव अत्यल्प असेल. गेल्या २४ तासांतील हवामानावर नजर टाकल्यास प्रत्येक जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात एक ते चार अंशांनी घट झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसांत नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पारा आणखी घसरणार हे उघड आहे.