Monday, January 13, 2025

Latest Posts

मुंबईने विदर्भाचा पराभव करत ४२ व्यांदा उंचवला रणजी करंडक

| TOR News Network | Ranji Trophy Final 2023-24 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने 2024 च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाचा पराभव करत ४२ व्यांदा रंणजी करंडक उंचावला. मुंबईचा संघ ४८ वेळा रणजी फायनलमध्ये पोहोचला होता. तर विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या डावात 105 धावांत गुंडाळल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावात जबरदस्त झुंज दाखवली. मात्र अखेरच्या दिवशी खेळ फार वेळ चालला नाही आणि विदर्भाला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने १६९ धावांनी विजय नोंदवला. (Vidarbha lost to Mumbai in Ranji final)

या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व दिसून आले. विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला ५३८ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली परंतु केवळ ३६८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ गडी गमावून २४८ धावा केल्या होत्या. यानंतर संघाला कर्णधार अक्षर वाडकरकडून मॅचविनिंग इनिंगची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात विदर्भ संघाने एकही गडी गमावला नाही, मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई संघाने दमदार पुनरागमन करताना प्रथम अक्षय वाडकरला वैयक्तिक १०२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आणि हर्ष दुबेलाही ६५ च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले.

त्यानंतर मुंबईने विजयाच्या दिशेने पावले टाकले. येथून विदर्भाचा डाव गडगडण्यास जास्त वेळ लागला नाही आणि संपूर्ण संघ ३६८ धावांवर आटोपला. मुंबईकडून या डावात तनुष कोटियनने ४ तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने २-२ बळी घेतले. शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांनीही प्रत्येकी १ बळी घेण्यात यश मिळविले.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली या रणजी मोसमात मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यात त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. एकात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर बडोदाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अनिर्णित राहिला तेव्हा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला. जिथे त्यांनी तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव केला. आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Latest Posts

Don't Miss