Friday, January 17, 2025

Latest Posts

नैतिकतेची कँडी’क्रश

Candy Crush Best Marathi Blog : महेंद्रसिंग धोनीचा ‘कॅण्डी क्रश’ (MS Dhoni & Candy Crush) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तासाभरात कॅण्डी क्रशचे ऍप्लिकेशन 30 लाख लोकांनी डाउनलोड केल्याची बातमी पसरली. बघता बघता बातमीचीही बातमी झाली आणि सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म धोनीच्या फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांनी ओसंडून वाहू लागले. त्यानंतर उलट सुलट चर्चाही रंगल्या. काहींच्या मते धोनी विमान सफरीच्या फावल्या वेळेत कँडी क्रश खेळताना कॅमेरात कैद होणं हा निव्वळ योगायोग होता आणि त्याची ही नैसर्गिक आवड लोकांना आवडली; तर काहींच्या मते ही हेतुपुरस्सर केलेली कँडी क्रश ॲपची जाहिरात होती आणि त्यासाठी सगळं वातावरण प्लॅन केलं गेलं होतं. विषय धोनीचं कँडी क्रश खेळणं हे सहज होतं की हेतुपुरस्सर हा नाहीच आहे, विषय खरंतर त्या पलीकडचा आणि जरा गंभीर असा आहे. धोनी त्याच्या फावल्या वेळात खेळतो म्हणून तासाभरात ३० लाख लोकांनी एखादा गेम डाऊनलोड करून घेणं हा आकडाच जरा अचंबित करणारा आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्या वागण्याचा, आवडीनिवडीचा संपूर्ण समाजावर केवढा मोठा प्रभाव असतो ह्याचे हे जिवंत उदाहरण. ह्याची जाणीव आणि त्याबाबतची आवश्यक संवेदनशीलता किती सेलिब्रिटींना असते हा  खरा प्रश्न, या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे.

भारत हा बहुतांश भाबड्या लोकांचा देश आहे. भारतातला प्रत्येक माणूस अगदी आबालवृद्ध कुठल्यातरी सेलिब्रिटीचा चाहता असतो. ते खेळाडू असतील, चित्रपट अभिनेते असतील किंवा राजकीय नेते; आपल्या आवडत्या सेलिब्रिटींवर जीवही ओवाळून टाकायला इथली माणसं तयार असतात. मला आठवतं २००९ साली आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांच्या आत्महत्यांची मोठी लाट उसळली होती. ह्या आत्महत्या थांबवायला विशेष प्रयत्न करावे लागले होते. ह्या सेलिब्रिटींचा सामान्यांच्या आयुष्यावर असा फार गहिरा प्रभाव असतो. अगदी त्यांच्या हेअरस्टाईलपासून ते त्यांच्या लाईफस्टाईलपर्यंत लोकं त्यांना फॉलो करत असतात. एकेकाळी ‘साधना’ या चित्रपट अभिनेत्रीची हेअरस्टाईल खूप गाजली होती, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ट्रेंडिंग होती. कपाळ रुंद असल्याने ते लपवायला समोर काढलेल्या केसांच्या बटा देशभरातल्या मुलींच्या आकर्षणाचा विषय झाला होता. त्याकाळात प्रत्येक मुलीला साधनासारखं दिसायचं असायचं आणि म्हणून कपाळावर केसांच्या बटा पसरून तिच्यासारखं दिसण्याचा त्या प्रयत्न करायच्या. अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, संजय दत्त आणि सलमान खान यांच्याही हेअरस्टाईल तत्कालीन तरुणांनी मोठ्या प्रमाणात कॉपी केली होती. मुमताजच्या साडी नेसण्याची पद्धत, आशा परेखच्या ड्रेसचा पॅटर्न, श्रीदेवीने चांदणी चित्रपटात नेसलेल्या कोऱ्या रंगीत साड्या, माधुरी दीक्षितने ‘दिल तो पागल है’ मध्ये घातलेले पारदर्शक सलवार हे देशात अनेक वर्ष त्यांच्या त्यांच्या नावाने ओळखले, खपले, विकले जात राहिले. जबरदस्त चाहते असणाऱ्या अश्या सेलिब्रिटींच्या या प्रसिद्धीचा कुठल्या कुठल्या पद्धतीने उपयोग करून घेता येईल ह्यासाठी पूर्वीपासूनच जाहिरात कंपनी देखील प्रयत्नरत असतात. पूर्वी या सगळ्याचा फक्त सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी उपयोग केला जायचा, ह्यात सरकारी जाहिरातींचाही समावेश होता आणि कलाकार स्वतःही अनेकदा नैतिक जबाबदारी म्हणून, सामाजिक देणं फेडायचं म्हणून समाजहिताच्या जाहिराती करत असत. एक काळ होता देशातून पोलिओ ह्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवली जात होती. त्यासाठी ५ वर्षाखालील प्रत्येक मुलांना पोलिओची लस पाजणे अनिर्वार्य होते. अश्यात देशातील  सगळ्यात लोकप्रिय आणि प्रत्येकाला आपलासा, विश्वासार्ह वाटणारा सिनेअभिनेता अमिताभ बच्चनने ही सरकारी जाहिरात स्वीकारली आणि त्यांच्या माध्यमातून अगदी घराघरात पोचून, लोकांचा विश्वास संपादन करत, लस घेण्याचे महत्त्व पटवून, लोकांना आरोग्य विभागापर्यंत खेचत आणून, प्रत्येक लहान मुलांनी लस घेतलीय हे खातरजमा करत, भारतातून पोलिओ हा आजार हुसकावून लावण्यात महत्वपूर्ण सहभाग नोंदवला. एकेकाळी अध्यात्मिक, देवभोळ्या असणाऱ्या भारत देशात नॉनव्हेज खाणे फार साधारण मानले जात नसे. नॉनव्हेज खाण्याचे विशेष दिवसच ठरलेले होते. तेव्हा प्रोटीनचे उत्तम स्रोत असलेले अंडे लोकांनी खावेत यासाठी चक्क सरकारला खेळाडू सेलिब्रिटींना घेऊन “संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे” अशी जाहिरात करावी लागली होती. ही जाहिरात तेव्हा दारासिंग ह्यांनी आणि पुढे कपिल देवने केली होती.

आजचा काळ हा सामाजिक माध्यमांचा (सोशल मीडिया) काळ आहे असे आपण सहज बोलून जातो. समाज माध्यमांमुळे, इंटरनेटमुळे माहितीचा स्फोट झाला आहे असेही म्हंटले जाते. इथे टिकून राहण्यासाठी, दिसण्यासाठी ‘कट थ्रोट’ स्पर्धाच जणू चालू असते. मध्ये एक जाहिरात आली होती त्यात अनुष्का शर्मा म्हणाली की – “Whatever you do, whatever you say, if you are trending you are here to stay.” म्हणजे काहीही करा, काहीही बोला, जर तुम्ही प्रसिद्धी माध्यमात सर्वात वर किंवा प्रकाश झोतात राहाल तरच तुम्ही इथे राज्य कराल. समाज माध्यमांचा इतका पगडा का बसला हा खरेतर समाजाच्या स्वास्थ्याचा विषय होऊ शकेल. सोशल मीडिया किंवा व्हर्च्युअल जग हे सुद्धा शेवटी खऱ्याखुऱ्या समाजाचाच आरसा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. सामाजिक माध्यमे हे देखील सध्याचे जाहिरात करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. पण इथे टिकून राहण्यासाठी असण्यापेक्षा दिसण्यावर अधिक भर दिला जातो. उत्पादन कितीही चांगले असले तरी ते विकण्यासाठी आकर्षक पॅकेज तयार केले जाते. आतल्या मालाच्या दर्जापेक्षा जास्त त्याच्या बाहेरील स्वरूपावर लक्ष दिले जाते, खर्च केला जातो. ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी ऑफर्सचा देखील वापर केला जातो, आणि मोठ्या प्रसारासाठी सेलिब्रिटींचा वापर मग ओघाने आलाच. मात्र या सगळ्या स्पर्धेत टिकाव धरायला, प्रसिद्धी मिळवायला-टिकवायला उर फोडून धावताना समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारीदेखील आहे ह्याचा विसर सेलिब्रिटींनापडतो आहे की काय असे प्रश्न देखील राहून राहून उठत राहतात. जेव्हा ह्या प्रसिद्ध व्यक्ती अयोग्य, घातक किंवा चुकीच्या उत्पादनांची जाहिरात बिनदिक्कत करताना दिसतात. तेव्हा त्याचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात समाजमनावर पडत असेल यात आता काही शंकाही उरलेली नाही. पण मग ते असे का करतात? त्यांना समाजाची काळजी का नसेल, हा प्रश्न सलत राहतो.

समाजाप्रती नैतिकतेची जाणीव न ठेवता, स्वार्थापोटी आंधळे होवून कृती करणे, मोह उत्पन्न होवून चोरी करणे, खोटे बोलणे, एखाद्याला शारिरीक मानसिक हानी होईल अश्या गोष्टी करायला लावणे ह्या नैतिक अधःपतनाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. नैतिक गोष्ट ही कल्याणवादी, उपयोगितावादी, सर्वभुतहितवादी असते. ही कृती करणारा आणि ती ज्याच्यासाठी केली आहे अशा दोघानाही  त्याचा सारखाच फायदा होत असतो. पण आजच्या युगात जरा वेळ थांबून शांतपणे ह्या सगळ्याचा विचार करायला आणि नैतिक बाबींची जबाबदारी घेऊन, महत्त्व समजून कृती करायला वेळ कुणाकडे आहे ? अगदी लोकप्रिय असणाऱ्या आणि मोठ्या संख्येने लोकं ज्यांची नकल करतात अश्या सेलिब्रिटींकडेही नाही. सगळ्या ठिकाणी व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग असतात पण कोठेच चारित्र्य घडणीचे वर्ग मात्र दिसत नाहीत, त्याचेच हे परिणाम.

महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूच्या अगदी साधारणशा एका कृतीतून तासाभरात लाखो लोकं प्रभावित होत असतील तर, ज्या समाजामुळे आपण प्रकाश झोतात आलो, ज्यांच्यामुळे पत, प्रतिष्ठा, पैसे, प्रसिद्धी उपभोगता आली त्या समाजाला काहीतरी चांगले देण्याची जबाबदारी आपण निभावली पाहिजे. पैसे-प्रतिष्ठा कमावतांनाच समांतर अनेक सकारात्मक बाबतीत ह्या प्रसिद्धीचा, व्यक्तिमत्त्वाचा, प्रभावाचा वापर करता येईल का हे बघायला काय हरकत आहे. उदाहरणार्थ त्यांनी वृक्षारोपण करतानाच एखादा व्हिडीओ टाकला, चांगली पुस्तकं वाचताना स्टेटस शेअर केले, गरजुंची मदत करताना वरचेवर रिल तयार केले, तरुणांमध्ये चांगले विचार रुजविण्याचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले तर काही प्रमाणात तरी सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकेल यात शंका नाही, पण तसे होताना दिसत नाही..

दुसऱ्या बाजूने, समजा धोनी कँडी क्रश ऐवजी पुस्तक वाचताना दिसला असता तर या ३० लाखांपैकी किती लोकांनी जाऊन पुस्तकं विकत घेतली असती ? किती जणांनी तितक्याच उत्साहात वृक्षारोपण केले असते ?  सेलिब्रिटींच्या पुढ्यात उभा आजचा जबाबदार समाज म्हणून मी काय स्वीकारावे काय स्वीकारू नये..कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यावे, काय अंगिकारावे, माझ्या निवडीची माझी स्वतःची जबाबदारी आहे हे समजून उमजून मी माझे वागणे बदलतो का? हा आजच्या पिढीसाठी या निमित्ताने पडलेला आणखी एक ठळक प्रश्न आहे. आणि आता प्रत्येकाने ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

©रश्मी पदवाड मदनकर
[email protected]

Latest Posts

Don't Miss