Tuesday, January 14, 2025

Latest Posts

एक कोटीहून नागरिकांचा विकसीत भारत संकल्प यात्रेत सहभाग

Bharat Sankalp Yatra News : झारखंडमधील खुंटी येथून १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा ही देशभरातील नागरिकांशी संपर्क वाढवणारी एक परिवर्तनकारी मोहीम म्हणून उदयास आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या सानुकूलित पोर्टलवर प्राप्त डेटानुसार, ७ डिसेंबर २०२३ पर्यंत, ३६,००० ग्रामपंचायतींमध्ये ही यात्रा पोहोचली आणि १ कोटीहून अधिक नागरिकांचा त्यात सहभाग होता. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश ३७ लाखांहून अधिक लोकांच्या सहभागाने आघाडीवर आहे, त्याखालोखाल महाराष्ट्रात १२.०७ लाख आणि त्यापाठोपाठ गुजरातमध्ये ११.५८ लाख लोकसहभाग होता. जम्मू आणि काश्मीरमध्येही या यात्रेचे उत्साहवर्धक स्वागत झाले असून, आजमितीस ९ लाखांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत.

दिवसेंदिवस लोकसहभागाने अधिकाधिक वेग घेतला आहे. संकल्प यात्रेच्या पहिल्या आठवड्यात ५००,००० नागरिकांचा सहभाग होता, तर गेल्या १० दिवसांत देशभरातील ७७ लाखांहून अधिक लोक यात्रेत सहभागी झाले होते. शहरी भागातली यात्रा अल्पावधीत, ७०० हून अधिक ठिकाणी पोहोचली  आहे आणि २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करण्याची शपथ ७९ लाख व्यक्तींनी घेतली आहे.

लोकांनी सरकारी योजनांचा त्यांच्या फायद्यासाठी अंगीकार करावा या आवाहनासाठी माहिती, शिक्षण आणि दळणवळण (आयइसी) व्हॅन वापरून ही यात्रा २.६० हून अधिक ग्रामपंचायती आणि ३६०० हून अधिक शहरी स्थानिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचा अभूतपूर्व प्रयत्न करत आहे.

यात्रेचा केंद्रबिंदू महिला-केंद्रित योजनांबद्दल जागरुकता वाढवत आहे, ज्यामुळे ४६,००० हून अधिक लाभार्थींनी पीएम उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी केली आहे. आरोग्य शिबिरे देखील एक मोठी मोहीम ठरली आहेत आणि आजपर्यंत २२ लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून दाखवण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या ड्रोन प्रात्यक्षिकाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘ड्रोन दीदी योजने’ अंतर्गत १५,००० महिला बचत गटांना ड्रोन देण्याबरोबरच गटातील दोन सदस्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असल्याने, या ड्रोन उड्डाणांचे साक्षीदार होण्यासाठी महिला  मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. स्वयंसहायता बचत गट ही ड्रोन सेवा शुल्क आकारून भाड्याने देतील, जो बचत गटाच्या सदस्यांसाठी कमाईचा आणखी एक स्रोत ठरेल.

Latest Posts

Don't Miss