Monday, January 13, 2025

Latest Posts

गंभीर प्रकरणात अभिनेत्री जया प्रदाला कधीही होऊ शकते अटक

उत्तर प्रदेश पोलिसांची पथके मुंबई -दिल्लीकडे रवाना

Jaya Prada Arrest Latest News : सध्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा या फरार आहेत. त्यांचा शोध उत्तर प्रदेश पोलीस घेत आहेत. एका गंभीर प्रकारणात उत्तर प्रदेशमधील कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. (Court order to up police to arrest jaya prada) त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस या बॉलिवूड अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची पथके रवाना झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील खासदार-आमदार कोर्टात जया प्रदा यांच्याविरोधात दोन खटले चालू आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दोन वेळा आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात दोन खटले चालू आहेत. या खटल्यांप्रकरणी न्यायालयात कार्यवाही चालू आहे. परंतु, जया प्रदा न्यायालयासमोर हजर झाल्या नाहीत. त्यांच्याविरोधात तब्बल सहा वेळा एनबीडब्ल्यू (अजामीनपात्र) वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तरीदेखील त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला जुमानलं नाही. जया प्रदा एकदाही न्यायालयासमोर हजर झाल्या नाहीत. परिणामी न्यायमूर्तींनी पोलीस अधीक्षकांना जया प्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाने कडक निर्देश दिल्यानंर रामपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आहेत. रामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी जया प्रदा यांना शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं आहे. हे पथक मुंबई आणि दिल्लीत जया प्रदा यांचा तपास करत आहे. दरम्यान, जया प्रदा यांच्याविरोधातील खटल्यांप्रकरणी मागच्या सुनावणीवेळी जया प्रदा यांचे वकील अजहर खान न्यायालयात दाखल झाले होते. जया प्रदा यांच्या गैरहजर असल्यामुळे अजहर खान यांनी न्यायालयात रिकॉल अर्ज दाखल केला होता. परंतु, हा अर्ज न्यायमूर्तींनी फेटाळला.

काय आहे प्रकरण ?

जया प्रदा या भाजपाच्या तिकीटावर रामपूर मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी नूरपूर या गावात एका रस्त्याचं उद्घाटन केलं. त्यामुळे स्वार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जया प्रदा यांनी पिपलिया मिश्र या गावात आयोजित जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात केमरी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी रामपूरमधील एमपी-एमएलए कोर्टात जया प्रदा यांच्याविरोधात खटला चालू आहे.

Latest Posts

Don't Miss