| TOR News Network |
Mahavikas Aghadi Latest News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दुर्देवी घटना घडत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील गुन्ह्यांची प्रकरणं सारखी बाहेर येत आहेत. त्यामुळे राज्यात रोषाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात या घटनांवर संताप व्यक्त केला जात आहे. हा संताप व्यक्त केला जात असतानाच महाविकास आघाडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Mahavikas Aghadi important Meeting) उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही तातडीची बैठक बोलावली आहे. खुद्द शरद पवार हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले आहेत.
महाविकास आघाडीने आज ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे. (Urgent Meeting at Matoshri) उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच याबाबत महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यासोबतच बदलापूरमधील घटना, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते चर्चा करणार आहेत. मालवणात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे नेते मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीकडून काय भूमिका व्यक्त केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थेट पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पुतळाच पडल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच या बैठकीला अत्यंत महत्त्व आलं आहे.