Sunday, January 12, 2025

Latest Posts

नवाब मलिक अधिवेशनात कोणत्या गटासोबत बसणार?

Maharashtra Assembly Winter Session 2023: आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक देखील आज हजेरी लावणार आहेत. नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान हिवाळी आधिवेशनावेळी नवाब मलिक अजित पवार गटासोबत बसणार की शरद पवार गटासोबत याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.(From Which Group Ncp Leader Nawab Malik will Sit in Assembly Winter Session 2023 )

अजित पवार आणि समर्थक आमदारांनी शिवसेना भाजपला पाठिंबा देत सत्तेत सामील झाले, त्यानंतर पक्षात दोन गट पडले. तेव्हापासून आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी आतापर्यंत घेतली होती. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे. कामकाजात सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणुन अद्याप दोन्हीं नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रित बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान नवाब मलिक कोणत्या गटासोबत बसणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मलिक अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातसुरू होत्या. मात्र, आतापर्यंत नवाब मलिकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे मलिक हे शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार या चर्चांना आज अधिवेशनात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

मी राष्ट्रवादी मध्येच – नवाब मलिक

मी राष्ट्रवादी मध्ये आहे. अधिवेशनात विधानभवनाच्या दरम्यान राजकीय मुद्द्यावर बोलणार नाही. माझ्या मतदार संघाच्या समस्या सभागृहात मांडणार आहे. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे पुण्याचे आमदार पवार होते. आमच्यात कोणतीही फाटाफूट नाही आम्ही एकच आहोत, असे आमदार नवाब मलिक म्हणाले. ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसले होते.

Latest Posts

Don't Miss