Monday, November 18, 2024

Latest Posts

इन्स्युलिनच्या जन्माची कथा 

| TOR News Network | Discovery Of Insulin : १९२२ च्या पूर्वी मधुमेहाने मरणाऱ्यांची संख्या टोकाला गेली होती. लहान मुलांना देखील मधुमेहाने ग्रासले होते. पहिल्यांदा इन्सुलिनचा शोध लागला तेव्हा अश्याच मरणासन्न मुलांवर हा प्रयोग करायचे ठरले. 1922 मध्ये, शास्त्रज्ञांचा एक गट टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये गेला जिथे मधुमेही मुलांना एका वेळी 50 किंवा त्याहून अधिक वॉर्डांमध्ये ठेवले जात होते. त्यापैकी बहुतेक कोमॅटोज (बेशुद्धावस्थेत) होते आणि डायबेटिक केटोआसिडोसिसमुळे मरणाच्या सीमारेषेवर पोचले होते.

मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवांचे निकामी होणे सुरु झाले की मृत्यूच ह्यांना सोडवेल अशी धारणा असे, त्यामुळे मृत्यूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मधुमेहाच्या पहिल्या स्तराच्या रुग्णावर प्रयोग करण्यापेक्षा मरणासन्न मुलांवर उपचार करणे योग्य होते, कारण तशीही त्यांच्या परतण्याची आशा कमी होती त्यामुळे प्रयोग फसला तरी त्याने जास्त नुकसान होणार नव्हते. पण प्रयोग यशस्वी झाला तर ह्या लहान मुलांचे आयुष्य सत्कर्मी लागणार होते. त्यांनाही जीवनदान मिळणार होते. शास्त्रज्ञांनी झपाट्याने हालचाली सुरु केल्या आणि इन्सुलिनच्या नवीन शुद्ध अर्कासह मुलांना इंजेक्शन देण्यास पुढे सरसावले.

त्यांनी एकेक मुलाला शुद्ध अर्काच्या इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. ते जसजसे एकेक मुलाला इंजेक्शन देत पुढे जाऊ लागले तसतसे आधी इंजेक्शन दिलेली मुले शुद्धीवर येऊ लागली. मग एक एक करून सर्व मुले त्यांच्या डायबेटिक कोमातून जागी झाली. मृत्यू, दुःख, भीती आणि अंधकाराने भरलेली खोली अचानक आनंद आणि आशेने भरून गेली.

1920 च्या दशकाच्या सुरुवातीस, फ्रेडरिक बॅंटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी टोरंटो विद्यापीठात जॉन मॅक्लिओडच्या अंतर्गत इन्सुलिनचा शोध लावला. जेम्स कॉलीप यांच्या मदतीने इन्सुलिनचे शुद्धीकरण करण्यात आले, ज्यामुळे ते मधुमेहावर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी उपलब्ध झाले. १९२२ मध्ये त्याच्या यशस्वी प्रयोगानंतर जगभर मधुमेहावर उपचार करणे शक्य झाले. बॅंटिंग आणि मॅक्लिओड या दोघांनाही 1923 मध्ये त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बॅंटिंग यांना नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा ते फक्त 32 वर्षांचे होते आणि त्यांनी बक्षिसाची अर्धी रक्कम बेस्टसोबत शेअर करायचे ठरवले, जो त्यांचा सहाय्यक होता आणि त्यावेळी तो फक्त 24 वर्षांचा होता. बॅंटिंगने पेटंटवर आपले नाव देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ते टोरंटो विद्यापीठाला $1 मध्ये विकले. लाखो जीव वाचवणाऱ्या शोधातून फायदा मिळवणे अनैतिक आहे असे त्याला वाटत होते..

बेस्ट मराठी ब्लॉग – अशाश्वताचा झुला

“इन्सुलिन हे माणसांना जगवण्यासाठी आहे, त्यामुळे ते माझे नाहीच, ते जगाचे आहे” तो म्हणाला होता.
इन्सुलिनवर पेटंट नसल्यानेच जगभर त्याचा उपयोग करून रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. अशा माणसांना सलामच करायला हवा.

इन्स्युलिनच्या प्रयोगाला आणि मानवी सेवेत उतरले त्याला आता १०० वर्ष झालीत . ही कथा इंग्रजीतून वाचनात आली, वाटलं सर्वांशी शेअर करावी. म्हणून हा भावानुवाद प्रपंच.

Latest Posts

Don't Miss