| TOR News Network | Devendra Fadnavis On Zade Kunbi Samaj In Nagpur : जोपर्यंत समाजाच्या विकास होत नाही तोपर्यंत राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होऊ शकत नाही. संस्था समाजाला एकत्रित करून संघटित करीत असते असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
विदर्भातील झाडे कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वसतीगृह, ई-लायब्ररी व अभ्यासिका भवन अशा विविध विकासकामांच्या पिपळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.(Zade Kunbi Samaj) कार्यक्रमाला भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, झाडे कुणबी समाज नागपूरचे अध्यक्ष राजेश चुटे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शिक्षणासाठी आणि मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी हे वसतीगृह फायद्याचे ठरेल. नवनवीन उपलब्धी गाठण्याच्या प्रयत्नाला या प्रकल्पातून हातभार लागतो. समाजाच्या विकासकामांसाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. डॉ. प्रभाकर हेमणे यांच्या पुस्तकाचे विमोचन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.