Saturday, January 11, 2025

Latest Posts

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मनपामध्ये उत्साहात साजरी

मनपा विद्यार्थिनींनी सादर केले लेझीम नृत्य

| TOR News Network | |Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Celebration In NMC|

नागपूर, ता. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (१९ फेब्रुवारी) नागपूर महानगरपालिका मुख्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. मनपा मुख्यालयात हिरवळीवर शिवजयंती कार्यक्रम घेण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी अभिवादन केले. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रस्तूत होणाऱ्या आदर्शांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनानंतर सामुहिकरित्या ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत गायले गेले.

यावेळी उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, शिक्षणाधिकारी साधना सयाम, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, राजेंद्र राठोड, राजकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.

मनपाच्या विवेकांनद नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी देवेंद्र वर्मा याने बालशिवाजींची वेशभूषा साकारली. बालशिवाजींच्या वेशभूषेतील देवेंद्र वर्माने यावेळी मनोगत देखील व्यक्त केले. विवेकांनद नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी ‘आमचे दैवत छत्रपती…” या गीतावर लेझीम नृत्य सादर केले. मनपाचे संगीत शिक्षक प्रकाश कलसिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला. त्यांना कृणाल दहेकर (तबला) आणि कमलाकर मानमोडे (हार्मोनियम) यांनी साथ दिली.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी आभार देखील मानले.

Latest Posts

Don't Miss