Michaung Cyclone Latest News: चेन्नईनंतर आता मिचॉन्गने आपला मोर्चा दक्षिणेकडील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांकडे वळवला आहे.येथे मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. चेन्नईत जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. (After Chennai Cyclone Michaung in tamil nadu and andhra pradesh)
गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीजवळ दाखल झाल्याने मुसळधार पाऊस होत आहे. ज्यामुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे 12 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. हे चक्रीवादळ मंगळवारी सकाळी नेल्लोर ते मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आज बापटला किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा बसत असल्याने राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनसीमा आणि काकीनाडा या आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमरावती हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर तब्बल 110 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हवेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे चक्रिवादळ मंगळवारी दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टनम यांच्या मध्ये बापटलाच्या जवळून जाईल.