Sunday, November 17, 2024

Latest Posts

 सरकारविरुद्ध प्रक्षोभक भाषा भोवली : अखेर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

| TOR News Network | Manoj Jarange Patil latest News : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अखेर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बीडच्या अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांची व्यापक बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत सरकारविरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered against Manoj Jarange patil in beed)

बैठकीत खोटी माहिती प्रसारित करणे, सरकारविरुद्ध प्रक्षोभक भाषा वापरणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असे आरोप जरांगेंवर करण्यात आलेत. मनोज जरांगेंसह बैठकीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर ज्या मंगल कार्यलयात जरांगेंची बैठक होती त्या मंगल कार्यालयाच्या मालकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

बैठक रात्री १० च्या पुढे सुरू झाली

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सदर बैठक काल रात्री ९ ला सुरू होणार होती. मात्र प्रत्यक्षात ही बैठक रात्री १० च्या पुढे सुरू झाली. मनोज जरांगे यांनी उपस्थित जनसमुदाय समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शिंदे साहेबांनी आपला विश्वास तोडलाय, असं म्हटल्याची नोंद तक्रारीत आहे.

त्या महिला तुमच्या कोणीच नाहीत का?

तुमची हुशारी तुमच्या पाशी ठेवा मी कट्टर खानदानी व्यक्ती आहे. तुम्ही पालक आहात मग तरीही तुम्हाला अंतरवालीत महिला दिसल्या नाहीत का? त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या का केल्या ? त्या महिला तुमच्या कोणीच नाहीत का? तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा. पण आम्ही तुम्हाला हिसका दाखवणारच, असं जरांगे पाटलांनी म्हटल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

हे सर्व तुम्हाला दिसले नाही का?

यावेळी एका मुलीच्या पायाला गोळी लागली तेव्हा तिला किती वेदना झाल्या. तिच्या कुटुंबीयांची काय परिस्थिती झाली. हे सर्व तुम्हाला दिसले नाही का, असंही जरांगे म्हणाले. जालना अंतरवलीच्या घटनेचा संदर्भात मुलीच्या पायाला अशी कोणतीही गोळी लागलेली नसताना, खोटी माहिती प्रसारित केली. तसेच सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने सरकार विरोधात प्रक्षेपक स्वरूपाचे भाषण केले, असा आरोप पोलीस कर्मचारी संतोष बदने यांनी केला आहे. यावरून जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss