स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी मोहिम अंतर्गत अभिनव उपक्रम : प्लास्टिक मुक्त करण्याचा दिशेत पाऊल
NMC News: सिंगल युज्ड प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. त्यावर कापडी पिशवी एक उत्तम पर्याय होऊ शकते. याकरिता नागपूर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी मोहिम अंतर्गत इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी मिळून कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील दालनात कापडी पिशव्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या साड्या, बेडशीट, पडदे आदी कपडे गोळा करण्यासाठी विशेष दान केंद्र तयार करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मनपा आयुक्तांनी स्वतः या केंद्रात कपडे दान करीत इतरांनी देखील उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार, श्री.रोहिदास राठोड, फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे श्री. विजय लिमये, श्री. अनीत कोल्हे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचावापर सुरू करावा,असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. तसेच केंद्र शासनाच्या या अभिनव स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवीत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यात मदत करावी असेही आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.
दिवाळी तोंडावर आली आहे आणि घरोघरी सणासुदीची लगबग सुरू आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येक घरात स्वच्छता केंद्रस्थानी असल्याने नागरिक स्वच्छतेच्या कामात व्यग्र आहेत. देशात सणासुदीच्यापर्वाचे औचित्य साधून, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 06 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत मिशन स्वच्छ भारत -शहरी विभाग 2.0 अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहीम राबवत आहे. स्वच्छ भारताकडे देशाचा प्रवास आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची तत्त्वे (मिशन LiFE) यांच्यासोबत दिवाळीच्या सांस्कृतिक महत्त्वाची सांगड घालणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
त्याअनुषंगाने नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील दालन व दहाही झोन अंतर्गत कापडी पिशव्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या साड्या, बेडशीट, पडदे आदी कपडे गोळा करण्यासाठी विशेष दान केंद्र तयार करण्यात आले.या विशेष दान केद्रांना मनपातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून याची सुरुवात मनपा येथून करण्यात आली. इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन लावलेल्या विशेष कपडे संकलन केंद्राला मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देत व्यक्तिगत आणलेलं साड्या, बेडशीट, पडदे आदी कपडे आदी कपडे भरभरून दान केले.