दिवसाढवळ्या घडला थरार : तीन आरोपींना अटक
नागपूर. पावसाळी नाल्यांची सफाई करीत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवार आणि गुप्तीने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना नागपुरात दिवसाढवळ्या घडली आहे. संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देउन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी दिली.
शनिवारी (ता.१७) धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड यशवंत स्टेडियम येथे झोनच्या लोककर्म विभागाचे श्री. सातपुते व आरोग्य विभागाचे श्री. विक्रम चव्हाण हे जेसीबी च्या माध्यमातून पावसाळी नाली सफाई करीत होते. दुपारी २ वाजता दरम्यान सदर ठिकाणी तीन युवक तारू पिउन आले व त्यांनी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. कर्मचा-यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. मात्र ते धारधार तलवार व गुप्ती घेउन कार्यस्थळी आले आणि कर्मचाऱ्यांना मारण्यास धावले.
युवकांच्या हल्ल्यातून बचाव करीत असताना श्री. सातपुते यांच्या हाताची बोटे कापली गेली तर श्री. विक्रम चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेउन सदर घटनेची माहिती देत तक्रार नोंदविली. पोलिस विभागामार्फत तिनही युवकांना अटक करण्यात आली असल्याचेही सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी सांगितले.