कोराडीच नाही तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प उभारण्यात येऊ नये तसेच १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करण्यात आली याविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीने संविधान चौक येथे सलग सहाव्या दिवशी "साखळी उपोषण" करण्यात आले. यादरम्यान जय विदर्भ पार्टी तर्फे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याकरीता भजन आंदोलन केले व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी व महावितरण ने वाढीव वीजदर मागे घ्यावे याकरिता कामना करण्यात आली.
राज्य सरकारने महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटीचे कर्ज आहे, ते भरून काढण्यासाठी १ एप्रिल पासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले व आवश्यकता नसतानाही कोराडी येथे ६६० मेगावॉटचा नवीन वीज निर्मिती सयंत्र उभारणीचा कट कारस्थान केला जात आहे. या विरोधात दि. १३ जून ते १९ जून २०२३ पर्यंत "साखळी उपोषण" केले जात आहे.
सलग सातव्या दिवशी सुद्धा संविधान चौक येथून गांधी पुतळा वेरायटी चौक पर्यंत वीजग्राहकांचा आक्रोश दर्शविन्या करता संध्याकाळी ६ वाजता "मशाल यात्रा" काढण्यात येणार आहे.
विदर्भातील सरकारी वीज कारखान्यात ७२०० मेगावॉट वीज तयार होते, विदर्भाला फक्त २२०० मेगावॉट वीज मिळते, वाचलेली ५ हजार मेगावॉट वीज उर्वरित महाराष्ट्र कडे वळविली जाते, वीज निर्मिती करता जमीन विदर्भाची, पाणी विदर्भाचे, कोळसा विदर्भाचा वरून प्रदूषण सुद्धा विदर्भालाच आणी त्यात कोराडी येथे ६६० मेगावॉट विजेचे नवीन सयंत्र उभारण्यात येत आहे. याला जय विदर्भ पार्टीचा विरोध आहे. या नवीन सयंत्रामुळे कोराडी व नागपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे. अगोदरच्या वीज निर्मिती सयंत्रामुळे कोराडीच्या २० किमी परिसरात शेती करने अशक्य झाले आहे. सयंत्रामधून निघणाऱ्या राखेमुळे शेतीत पिकांचे उत्पादन घटले आहे. नागरिकांना श्वास, दमा, कॅन्सर, हृदयरोगासारखा जीवघेणा आजाराने त्रास होत आहे. नवीन वीज निर्मिती सयंत्र स्थापित झाल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल होणार आहे. स्थानीय आमदार, खासदार यांनी या वीज प्रकल्पाचा विरोध केला नाही. कारण यामागे त्यांना मलाई मिळते. जनता मेली तरी या सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना याचे काही घेणे देणे नाही.
विदर्भातील वीज सयंत्रातून निर्मिती होणाऱ्या १ युनिट वीज मागे सरासरी २ रु. ५० पैसे खर्च येतो, विदर्भातील जनतेला १०० युनिट वीज वापरण्याकरीता प्रति युनिट ६ रु. ७४ पैसे, १०० ते ३०० युनिट वीज वापरण्याकरीता प्रति युनिट ११ रु. ९७ पैसे, ३०१ ते ५०० युनिट वीज वापरण्याकरता प्रति युनिट १५ रु. ९४ पैसे तर ५०१ युनिट वर १७ रु. ९० पैसे प्रति युनिट प्रमाणे मोजावे लागते. ही जनतेची लूट आहे, वीज महाग असल्याने कोणताही कारखानदार विदर्भात कारखाने लावायला तयार नाही, त्यामुळे विदर्भात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. तसेच रोजगाराच्या शोधात विदर्भातून मोठयाप्रमाणात युवकांचे पलायन होत आहे. जय विदर्भ पार्टीला वाढीव वीजदर मान्य नाही. विजेचे दर निम्मे झाले पाहिजे याकरीता जय विदर्भ पार्टी सातत्याने लढा देत आहे.
वीज निर्मिती होत असलेल्या विदर्भाच्याच जनतेला १२ तासाचे लोडशेडींग सोसावे लागत आहे. शेती पंपाला १२ ते १६ तासाचे लोडशेडींग, ज्या राज्यात वीज निर्मिती होत नाही अश्या अनेक राज्यात २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे व लोड शेडींग मुळातच नाही. तेलंगणात तर शेतकऱ्यांना मोफत २४ तास वीज दिल्या जात आहे.
साखळी उपोषणाला किसान एकता संघ, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ विकास पार्टी, महाविदर्भ जनजागरण समिती, भारतीय शिक्षण संस्था, बापूजी अणे स्मारक समिती, विदर्भ राज्य निर्माण मंच तर्फे जाहीर समर्थन करण्यात आले. आज उपोषण स्थळी जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, महासचिव विष्णूपंत आष्टीकर, सहसचिव अरविंद भोसले, पॉलिट ब्युरो सदस्य इंजि. तात्यासाहेब मत्ते, ऍड. श्रीकांत दौलतकार, महिला आघाडी अध्यक्ष सुधा पावडे, ज्योती खांडेकर, ऍड. मृणाल मोरे, नीलिमा सेलूकर, माधुरी चौहान, नरेश निमजे, राजेंद्र सतई, रवींद्र भामोडे, मदन नवघरे, कांचन कारंगळे, लता अवजेकर, हरिभाऊ पानबुडे, अनिल तिडके, अमूल साकुरे, विजय मोंदेकर, अशफाक रहमान, रामभाऊ शेगावंकर, प्रफुल पौनीकर, बसंतकुमार चौरसिया, नीलकंठ अंभोरे, सुरेंद्र शुक्ला, गणेश शर्मा, प्रशांत तागडे, श्रीकांत पांडे, सद्दाम शेख सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.