राज्यभरातील मनसैनिकांनी कडून अर्थात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, निमित्त आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. मंगळवारी 14 जून रोजी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे राज्यभतील पदाधिकारी थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यावर दाखल होतात. त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना एक आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन दाखल होतात. त्यामुळे यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा मिठाई न आणता येताना एखाद्या झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तर वाढदिवसानिमित्त जमणारे साहित्य हे गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे एक पत्रच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी लिहिले आहे.
काय लिहिले राज ठाकरेंनी पत्रात?
https://twitter.com/RajThackeray/status/1668165327501369344?s=20
“दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.” अशी विनंती राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे मोठ मोठे पोस्टर आता पासूनच लागण्यास सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसैनिकांना त्यांना भेटण्याची पर्वणी असते. मोठ्या संख्येने मनसैनिक राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल होत असतात.
तसेच, राज्यात अनेकत ठिकाणी 14 जूनला मनसैनिकांकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित असतात. अनेक ठिकाणी पदाधिकारी हे आरोग्य शिबिरांचे देखील आयोजन करत असतात. सध्या राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक शहरांत नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष बांधणीसाठीच्या या कामाला लागले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.