राजस्थानमधील उदयपूरच्या 34 वर्षीय अपेक्षा सिंघवीनी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास केली होती.
त्यांनी आयुष्यातील दहा वर्ष मोठमोठ्या संस्थांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलं. 2021 मध्ये त्यांना वीस लाख रुपयांचं पॅकेज होतं, मात्र ती नोकरी सोडून त्यांनी लाँड्री उद्योग सुरू केला. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे सर्वचजण चकीत झाले.
उदयपूरच्या भुवाना मध्ये त्यांनी त्यांचा लॉन्ड्री प्लांट सुरू केलाय. आज या लॉन्ड्रीमध्ये उदयपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हॉटेल्सचे कपडे धुण्यासाठी येतात.
खरं तर 2021 मध्ये या लॉन्ड्री प्लांटची सुरुवात झाली होती. स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची उमेद घेऊन अपेक्षा सिंघवी यांनी स्वेच्छेने चार्टर्ड अकाउंटंटच्या नोकरीचा राजीनामा दिला.
अपेक्षा सिंघवी सांगतात, "मी नोव्हेंबर 2009 मध्ये सीए फायनलची परीक्षा दिली. सीए इंटरमध्ये ऑल इंडिया 28 वी, सीएस फाऊंडेशनमध्ये ऑल इंडिया तिसरी तर महिला कॅटेगरीमध्ये पहिली रँक मिळाली."
त्या पुढे सांगतात, "2011 च्या जानेवारी महिन्यात मला गोव्यात वेदांता ग्रुपमध्ये पहिली नोकरी लागली. मी तिथे दोन वर्ष काम केलं. त्यानंतर मी हिंदुस्थान झिंकच्या उदयपूर हेड क्वार्टरमध्ये आणि देबारी मध्ये आठ वर्ष काम केलं. जुलै 2021 मध्ये माझं पॅकेज वाढून वीस लाख रुपये झालं होतं, पण मी नोकरीचा राजीनामा दिला."
चार्टर्ड अकाउंटंट आणि लॉन्ड्री या दोन्ही कामांचा दूरदूर पर्यंत संबंध नाही. अपेक्षा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय, ओळखीचे आणि मित्रपरिवार सगळ्यांनाच धक्का बसला.
अपेक्षा यांनी सलग दोन वर्ष मेहनत घेतली आणि लॉन्ड्रीचं काम वाढवलं. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं. अपेक्षा सांगतात, "सुरुवातीच्या काळात फक्त पाच क्लायंट होते. पण आज उदयपूरमधील पन्नास हॉटेल्स आमचे क्लायंट आहेत. नवीन क्लायंट जोडण्यासाठी मी सतत उदयपूरमधील हॉटेल्सला भेटी देत असते."