मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या शाळांसंदर्भात महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 24) दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होणार अशी चर्चा होतीच. मात्र आता शाळा सुरू करण्याबाबत नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष असणार आहे. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
शाळेत येण्याची सक्ती नाही : वर्षा गायकवाड
विद्यार्थ्यांवर शाळेत येण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती राहणार नाही. ते आपल्या पालकांच्या संमतीने शाळेती येतील. तसेच कोणत्याही लाभार्थी योजना किंवा परीक्षेसाठी उपस्थिती अनिवार्य केली जाणार नाही. सोबतच विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून शिक्षण घेता येईल. आमची सामग्री युट्युब वर देखील उपलब्ध आहे, असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.