जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम दरवर्षी बदलत असते. 2023 या वर्षीच्या ‘जागतिक रक्तदान दिना’ची थीम “Give blood, give plasma, share life, share often” अशी आहे. रक्तदानाबद्दलचे महत्त्वाचे समजगैरसमज जाणून घ्या.
रक्तदान कोण करू शकतं?
- रक्तदान करताना तुमचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात.
- नॅशनल ब्लड ट्रान्सफुजन काऊन्सिलच्या वेबसाईटनुसार,
- भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय 18 ते 65 दरम्यान असावं लागतं. भारतात पुरुष 3 महिन्यातून एकदा, तर महिला 4 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात.
- पण, काही देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय कायद्यानुसार 16 ते 17 वयोगटातील मुलांना रक्तदान करण्यास परवानगी आहे. पण, त्यासाठी त्यांना आवश्यक शारीरिक आणि रक्तविज्ञानविषयक निकषांची पूर्तता करणं गरजेचं असतं.
- तर काही देशांमध्ये, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नियमित रक्तदाते डॉक्टरांच्या सल्यानुसार रक्तदान करू शकतात. काही देशांमध्ये रक्तदानाची वयोमर्यादा 60 वर्षांपर्यंत आहे.
- रक्तदान करण्यासाठी तुमचं वजन 45 किलोपेक्षा कमी नसावं. आणि रक्तदात्याच्या शरिरातील हेमोग्लोबिन 12.5 ग्रॅमपेक्षा कमी नसावं.
रक्तदान कोण करू शकत नाही?
- गेल्या वर्षभरात असुरक्षित शरीरसंबंध ठेवणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- कुठल्याही रिक्रिएशनल अंमली पदार्थांचं इंजेक्शन घेतलं असेल तर रक्तदान करता येत नाही.
- एखाद्याची एचआयव्हीची चाचणी सकारात्मक आली असेल, तर अशा व्यक्तीला रक्तदान करता येत नाही.
- रक्तदान करण्यापूर्वी तीन महिने आधी मलेरियावर उपचार घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- रक्तदात्यानं रक्तदान करण्याच्या 15 दिवस आधी कॉलरा, टायफाईड, प्लेग यांची लस घेतलेली असेल तसंच रक्तदानाच्या एक वर्षापूर्वी रेबीजची लस घेतली असेल, तर त्यालाही रक्तदान करता येत नाही.
- रक्तदात्यानं शरिरावर टॅटू काढला असेल तर त्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करता येत नाही
- हिपॅटायटीस-बी आणि सी, टीबी, एचआयव्ही आणि कुष्ठरोगाचा त्रास असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा रुग्ण रक्तदान करू शकत नाही.
- हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्ज घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.