•   Thursday, August 14
शिक्षण

RTMNU: खेलो इंडिया विद्यापीठ खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना ध्वज प्रदान

मैदाने ही राष्ट्राची शक्तीस्थळे असल्याचे प्रतिपादन अधिसभा सदस्य वामनराव तुर्के यांनी केले. खेलो इंडिया विद्यापीठ खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना ध्वजप्रदान सोहळा व्यवसाय प्रबंधन विभागाच्या सभागृहात मंगळवार, दिनांक २३ मे २०२३ रोजी पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तुर्के बोलत होते.


ध्वज प्रदान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य विजय मुनिश्वर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य वामनराव तुर्के, अधिसभा सदस्य डॉ. संजय चौधरी, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तुर्के यांनी खेळाडूंना स्पर्धेकरिता जात असताना पूर्वी कशाप्रकारे प्रवास करावा लागत होता याची माहिती दिली. विद्यापीठाचे नावलौकिक करण्यासाठी स्पर्धेकरिता बाहेर जाणाऱ्या खेळाडूंना वातानुकूलित डब्यातून प्रवासाचे आरक्षण मिळावे म्हणून अधिसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतल्याची माहिती दिली. शरीर सुदृढ असेल तर मन देखील सुदृढ राहते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीता व त्यांच्या भजनातून खेळांविषयी प्रोत्साहित केले आहे.  महाराजांनी मैदानी स्पर्धांमधून तरुण तयार होत 'बलशाली भारत होवो' असे म्हटल्याचे सांगितले. संपूर्ण आयुष्यात केवळ विद्यार्थी दशेतच कमी दिवस आपल्या हातात असतात. त्याचा मेळ घालत यशाची प्राप्ती करावी लागते. ध्येय निश्चित असेल तरच यश प्राप्त होते.  आयुष्यात कोणतीच गोष्ट असाध्य नाही. आपणापासूनच सुरुवात झाल्यास आपला देश देखील बलशाली होईल, असे तुर्के म्हणाले.


विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रास्ताविक करताना संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ३८ खेळाडूंची खेलो इंडिया या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. ३८ खेळाडू विविध ९ खेळांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सेल्फी पॉईंट बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना अधिसभा सदस्य डॉ. संजय चौधरी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत अधिकाधिक पदके मिळविण्याचे आवाहन केले. टीम स्पिरीट दाखवून विद्यापीठाचा नवलौकिक वाढवावा असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण करताना अर्जुन पुरस्कार प्राप्त विजय मुनिश्वर यांनी सरकारने खेळाडूंना आता आर्थिक कवच दिल्याची माहिती दिली. पूर्वी खेळाडूंना स्पॉन्सर शोधावे लागत होते. प्रत्येक खेळाडूंना आता चांगल्या सुविधा मिळत आहे. चांगला आहार मिळतो आहे. खेळ मंत्रालयाकडे भरपूर पैसा असून खेळाडूंनी या पैशाचा सदुपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात पुसद येथील महेश नाईक यांचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नितीन जांगीटवार यांनी केले तर आभार डॉ. सोनाली शिरभाते यांनी मानले.


खेळाडूंना ध्वज प्रदान


उत्तर प्रदेशात पाच ठिकाणी होऊ घातलेल्या खेडो इंडिया विद्यापीठ खेळ स्पर्धेसाठी वैभव श्रीरामे या विद्यार्थ्याने विजय मुनिश्वर यांच्यासह प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज स्वीकारला. या कार्यक्रमात खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जॅकेट प्रदान करण्यात आले. यामध्ये वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, वैभव देशमुख, छकुली सेलोकार, कल्याणी चुटे, नुपूर बकाले सृष्टी शेंडे, भार्गवी रंभाड, पृथा डेकाटे, सोफिया सायमन, चैताली नायसे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना जॅकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन आदित्य सोनी यांनी केले.