मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आयटीआयमधील शिल्पनिदेशकांची पदे कायम ठेवून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते 25 हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा 297 कंत्राटी निदेशकांना होईल. यापूर्वी त्यांना 15 हजार रुपये मानधन मिळायचे. सध्या या आयटीआयमध्ये 297 निदेशक आहेत.
राज्यातील मनपा क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट 2010 पासून सुरु करण्यासाठी एकूण 1500 शिक्षकीय पदांना 2010 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. कंत्राटी शिल्प निदेशकांच्या सेवा 2010 पासून 2022 पर्यंत 12 वर्ष इतक्या झाल्या असून वाढलेली महागाई बघता आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.