Saturday, November 16, 2024

Latest Posts

राज्यात लवकरच पंचशक्ती अभियान; अजित पवारांची घोषणा

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : राज्यामध्ये सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्य सरकारकडून एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर केल्या गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यामध्ये अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (DCM Ajit Pawar on women safety) अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल अधिकची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी पंचशक्ती अभियान सुरु करण्याची घोषणा केली आहे.(Panchshakti abhiyan in maharashtra) यावरुन महिलांची सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाणार आहे.

काय आहे शक्ती बॉक्स?
शक्ती बॉक्स हे बारामती शहरातल्या एसटी स्टँड, कोचिंग सेंटर, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी लावण्यात येणार आहे. ही एक तक्रार पेटी असेल. या माध्यमातून मुलींना आपल्या तक्रारी यात टाकता येतील. शिवाय गांजा, गुटखा किंवा अवैध गोष्टींची तक्रारही त्यांना यातून करता येतील. ज्याने ही तक्रार केली आहे त्याचे नाव हे गोपनिय ठेवण्यात येईल. या संकल्पनेतून ज्या मुली आणि महिला पुढे येवून तक्रारी करू शकत नाही त्यांना मदत होणार आहे.

महिलांसाठी शक्ती नंबर
एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह ही या मागची संकल्पना आहे. त्यासाठी शक्ती नंबर देण्यात आला आहे. तो शक्ती नंबर 9209394917 असा आहे. या क्रमांकाची सेवा 24/7 सुरू असेल. या शक्ती नंबरवर ही तक्रार करता येऊ शकेल.तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल अशा वेळी या क्रमांकावर तातडीने संपर्क करता येईल. त्यानंतर मदतही त्याच वेगाने पोहोचवली जाईल.

सर्वांवर असणार शक्ती नजर
तरुण आणि तरुणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे ते सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करत आहेत त्यावर नजर ठेवण्यासाठी शक्ती नजर असेल. या माध्यमातून फेसबुकवर केल्या जाणाऱ्या पोस्ट, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस यावर लक्ष ठेवलं जाईल. अनेक वेळा सोशल मीडियावर शस्त्र, बंदूक, पिस्तूल, चाकू अशा पोस्ट टाकल्या जातात. त्यावर शक्ती नजर समाजातून लक्ष ठेवेल. शिवाय कारवाईचाही बडगा उगारेल.

मुलींसाठी शक्ती भेट
शक्ती भेटच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या, रुग्णालय, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला होस्टेल या ठिकाणी भेटी दिल्या जातील. तिथे असलेल्या महिला मुलींना महिलांचे कायदे, गुड टच, बॅड टच, याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. वाढती गुन्हेगारी या संदर्भात ही मार्गदर्शन केले जाईल. महिला- मुलींमध्ये जागरूकता निर्माण केले जाईल. त्यासाठी शक्ती भेट ही संकल्पना साकारली जाईल.

शक्ती कक्ष ही असेल मदतीला
बारामती पोलिस उपविभागीय कार्यालय आणि पोलिस स्थानकात आता शक्ती कक्ष उघडले जातील. तिथे महिलांच्या मदतीसाठी महिला पोलिस असतील. शिवाय कायद्याचेही ज्ञान या कक्षाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. किशोरवयीन मुलं -मुलींना गुन्हेगारी व व्यसनांपासून परावर्तन करण्याचं काम ही केलं जाणार आहे. अजित पवारांनी याबाबत तातडीचे बैठक घेत या पंचशक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यात मदत होईल.

Latest Posts

Don't Miss