Monday, November 18, 2024

Latest Posts

महानिर्मिती राख उपयोगिता शिबीर यशस्वीरीत्या संपन्न, राखेला समस्या न मानता संधी समजा…डॉ. धनंजय सावळकर

| TOR News Network |

नागपूर -१३ ऑगस्ट २०२४ : आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल अन्यथा अवकाळी निसर्ग अवकृपा पाहायला मिळेल. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा सजगतेने वापर करायला हवा,राखेला समस्या न मानता संधी समजायला हवे. महानिर्मिती राख धोरण २०२४ नुसार शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमाच्या रस्ता कामांसाठी राख उचल करणाऱ्या संस्थांना रु.१००/- प्रती टन आर्थिक सहाय्य करण्याचे महानिर्मितीचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच महानिर्मितीच्या कोराडी-खापरखेडा-चंद्रपूर वीज केंद्रात राख उचल करण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारणार असल्याचे डॉ. धनंजय सावळकर यांनी प्रतिपादन केले. ते नागपुरात आयोजित महानिर्मितीच्या राख उपयोगिता शिबिराच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
आगामी २० वर्षे औष्णिक विद्युत केंद्रांची गरज भासणार असून जसजशी विजेची मागणी वाढत आहे त्याप्रमाणात कोळशाचा वापर देखील वाढत आहे. राखेला संधी समजले तर अनेक उपयोग आहेत, राखेतून पैसा कमविणे हा महानिर्मितीचा उद्देश नसून राखेचा शास्त्रीय उपयोग करून नवनवीन संधी आणि रोजगारासोबतच विकासाची संधी उपलब्ध होऊ शकते. राखेचा जास्तीत जास्त वापर करा  “तुमची मदत करण्यासाठी आम्हाला मदत करा” असे डॉ.सावळकर यांनी  राख उचल करणाऱ्या ग्राहकांना आवाहन  केले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे संचालक(इंधन) डॉ.धनंजय सावळकर, प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालक पंकज सपाटे, डॉ. नितीन वाघ तसेच प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेमा देशपांडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी राख उपयोगिता आधारित चित्रफित दाखविण्यात आली. प्रास्ताविकातून डॉ. नितीन वाघ यांनी सांगितले कि, पर्यावरणीय बदलते निकष, वने, पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालय भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार महानिर्मितीने राख धोरण २०२४ नुसार शास्त्रीयदृष्ट्या जास्तीत जास्त राखेची उचल व्हावी म्हणून महानिर्मितीने आर्थिक सहकार्याची भूमिका आपल्या धोरणात स्वीकारली आहे. त्याचा लाभधारकांनी लाभ घ्यावा त्यासाठीच या शिबिराचे आयोजन आहे तर अधीक्षक अभियंता शैलेश पडोळ यांनी संगणकीय सादरीकरणातून चंद्रपूर, कोराडी आणि खापरखेडा येथे उपलब्ध राख, सोयी सुविधा, महानिर्मिती राख धोरण-२०२४, कार्यपद्धतीचा अवलंब, राख उपयोगिता वाढविण्यासाठी सुधारणा-प्रयत्न इत्यादी विषयांवर प्रकाश टाकला.

प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेमा देशपांडे यांनी सांगितले कि, वर्तमान युगात, विजेशिवाय राहणे कठीण झाले आहे आणि विजेचे उत्पादन करायचे झाले तर कोळसा लागेल आणि राखेची निर्मिती होईल. त्यामुळे राखेकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पहा. राख उचल करणाऱ्यांनी पर्यावरणीय नियमाच्या अधीन राहून राखेची साठवणूक, वाहतूक आणि वापर करायला हवा. त्यांनी उत्तम शिबीर आयोजनाबद्दल महानिर्मितीचे कौतुक केले आणि इतरही वीज केंद्रांच्या राख उपयोगिते संदर्भात सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढाकार घेईल असे सांगितले.  राख उचल करणाऱ्या ग्राहकांसाठी आवश्यक सोयी सुविधा, स्वतंत्र कॉरीडोर, प्राथमिकता तसेच कार्यपद्धतीत अधिक सुलभता आणण्यासाठी महानिर्मिती प्रयत्नशील असल्याचे समारोपीय मनोगतातून प्रमुख अतिथी पंकज सपाटे यांनी भूमिका मांडली.

महानिर्मिती राख धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी राख उचल ग्राहकांनी सूचना, मागण्या प्रश्नोत्तराच्या रूपाने मांडल्या त्यात, रियल टाईम डॅशबोर्ड प्रणाली, समाजमाध्यमांवर प्रसिद्धी,  लघुउद्योजकांना राख उचल करण्याकरिता कर आणि वाहतुकीत सवलत, मोठ्या प्रमाणात राख उचल करणाऱ्या ग्राहकांना स्वतंत्र रस्ता-सोयी सुविधा, उपलब्ध सोयी सुविधांमध्ये वाढ, सिमेंट उद्योगाला सवलत, राखेचे वर्गीकरण करण्यात यावे, औद्योगिक क्षेत्रात सायलो लावणे, कोराडी राख क्लस्टर उभारणे, दगडी खाणी भरण्याकरिता वाहतूक खर्च देण्यात यावा अशी भूमिका मांडण्यात आली. अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, दालमिया सिमेंट, अंबुजा सिमेंट, एशटेक, बुटीबोरी औद्योगिक असोसिएशन, वाहतूकदार, विटा उत्पादक, राखवस्तू उत्पादक कंपन्या, वेकोली, रेडी मिक्स कॉक्रीट तसेच शासकीय, निमशासकीय, कोर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शिबिराचे सूत्र संचलन श्वेता शेलगांवकर यांनी तर प्रश्नोत्तरे तासाचे संचलन कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी यांनी केले.

या शिबिरात मुख्य अभियंते गिरीश कुमरवार, विलास मोटघरे, विराज चौधरी, शशांक चव्हाण, सुनील सोनपेठकर, किशोर राऊत, राजेशकुमार ओसवाल, चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, राख हाताळणी विभाग अधिकारी-कर्मचारी इत्यादींनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराच्या यशस्वीतेत आयोजन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.

Latest Posts

Don't Miss