Sunday, November 17, 2024

Latest Posts

नवा ट्विस्ट :  छगन भुजबळ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात 

| TOR News Network | Chhagan Bhujbal Latest News : भाजप,शिवसेनेने जरी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले असले, तरी काही जागांवरचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच महायुतीच्या जागा वाटपात नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. (Chhagan bhujbal from nashik lok sabha)

आज पुण्यात तातडीची बैठक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला छगन भुजबळांसह नाशिक लोकसभेतील अजित पवार गटाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

सकाळी ८ वाजता छगन भुजबळ नाशिक येथील फार्मवरून पदाधिकाऱ्यांसह पुण्याला रवाना झालेत. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये आधीच धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाकडे असलेली ही जागा यंदाच्या निवडणुकीत भाजपला सोडावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

भाजप आणि शिंदे गटात चांगलीच खडाजंगी

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार अशी घोषणा केली होती. यावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच खडाजंगी देखील झाली. अशातच, या जागेसाठी अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आले आहे.

तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील

मंगळवारपासून छगन भुजबळ यांचे व्हिडिओ नाशिकच्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, “माझं नाव कार्यकर्त्यांनी चर्चेत आणले. पण याबाबत तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. काय रुसवे आहे, नाराजी आहे याबत गोषवारा घेतील, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss