Wednesday, November 20, 2024

Latest Posts

माता न तू वैरिणी…

| TOR News Network |

Suchana Seth Crime Story

Suchana Seth Crime Story In Marathi : जे नाव/नातं सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचं आहे, ह्रदयात जिचं अढळ स्थान आहे, जिला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आहे अशी व्यक्ती म्हणजे माता, जननी, माऊली…
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी…
माता शब्द बनला आहे तो मातृ या शब्दापासून. नवीन जीवन उत्पन्न करणारी, जन्म घालणारी ती माता…आपल्या संस्कृतीत तर”मातृदेवो भव” असा मातेचा गौरव केला जातो. मातेला देवाप्रमाणे पूजलं जातं. तिचं स्थान  देवतातुल्य…नव्हे देवापेक्षाही वरचढ मानलं जातं. कुपुत्र होऊ शकतो पण कुमाता कदापि शक्य नाही, होवूच शकत नाही इतका दृढ विश्वासजिच्याबद्दल असतो अशी ही माता, आई जी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन त्याला वाढवते, अगणित त्याग करून आपल्या मुलाला मोठं करते, त्याचं भविष्य उज्वल बनवते… ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ हे म्हटलं आहे ते काही वावगं नाही.

पण या सर्वांना तडा देणाऱ्या काही घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि आपलं मनोविश्व ढवळून जातं. आई या अत्यंत पवित्र शब्दावरून विश्वास  उठतो…

अशीच एक घटना नुकतीच घडली आणि संपूर्ण देश हादरून गेला. गोव्यात एका उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभ्रू महिलेने (सूचना सेठ, वय -39, सीईओ- आर्टिफिशियल इंटेलिजंट लॅब- स्टार्टअप कंपनी) स्वतःच्या पोटच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरला आणि बंगळुरूला निघाली. हॉटेल कर्मचारी आणि पोलिसांच्या सतर्कतेने, त्वरित कारवाईने तिला अटक करण्यात आली.

चौकशी दरम्यान रोज नवनवीन धक्कादायक विधाने समोर येत आहेत.
एका वृत्तानुसार सूचना सेठचा 2010 मध्ये तिच्या पतीसोबत प्रेम विवाह झाला होता आणि 2019 मध्ये त्यांना अपत्य प्राप्ती झाली आणि त्यानंतर दोघांच्या नात्यांमध्ये फूट पडली, वितुष्ट निर्माण झाले ज्याचे पर्यवसन शेवटी घटस्फोटात झाले (2020). मुलाची कस्टडी अर्थातच कोर्टाने आईकडे सोपवली आणि तिच्या पतीला दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली.

चौकशी दरम्यान असं एक वृत्त समोर आलं की, तिला तिच्या पतीला मुलाला भेटू द्यायची  इच्छा नव्हती. ती पतीचा इतका तिरस्कार करायची अन् त्यातूनच तिने हे भयंकर पाऊल उचललं. दुसऱ्या वृत्तानुसार सूचना सेठला आपला मुलगा हुबेहूब पतीसारखा दिसतो ह्यामुळेही त्याचा तिरस्कार वाटू लागला होता आणि तो तिरस्कार एवढा पराकोटीला पोहोचला की तिने असे घृणित कृत्य केले.एका वृत्तानुसार सूचनाला तिच्या पतीकडून पोटगीची रक्कम हवी होती म्हणून हे पाऊल उचलले.तिने पतीवर शारिरीक अत्याचारांचे आरोपही लावले होते.

नवीन आलेल्या वृत्तानुसार सुचना सेठने असाही जवाब नोंदवला की तिला ह्याबद्दल काहीच माहिती नाही. ती झोपली तेव्हा मुलगा जिवंत होता आणि उठल्यावर तो मृत झाला होता.
तसेच अत्यंत गोपनीय सुत्रांनुसार मुलाची हत्या केल्यावर तिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला जो अयशस्वी ठरला, असे सांगण्यात आले.

डोकं सून्न करून टाकणारी, मन बधिर करून टाकणारी अशी वृत्त आणि विधान…
काय कारणं असू शकतील अशा भयंकर कृत्यामागे???मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ह्यामागची कारणं शोधणं/ जाणून घेणं महत्वाचं आहे.

मानसशास्त्रीय भाषेत  ह्या कृत्याला फिलीसाईड (filicide) असं  म्हणतात.
फिलिसाईड म्हणजे स्वतः च्या मुलांना ठार मारण्याचं कृत्य…
.डॉ.फिलिप रेसनिक (Dr. Phillip Resnick) ह्यांनी 1969 साली प्रकाशित केलेल्या संशोधनात फिलिसाईड करण्यामागचे 5 उद्देश ( motives) सांगितले…

1) Altruistic- अतिसंवेदनशीलता-
मुलांबाबत अति संवेदनशीलता
जर मुलाला जन्मतःच काही गंभीर आजार, अपंगत्व  मतिमंदत्व, स्वमग्नता ( स्पेशली एबल्ड  मुलं) इ. असेल तर पालकांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते अन् त्या काळजीतून,  असुरक्षिततेच्या भावनेतून फिलिसाईडल कृत्य घडते.
म्हणजे अशा पालकांना वाटत की स्वतःच काही बरं वाईट झालं तर हे जग आपल्या मुलांसोबत क्रूरपणे वागेल…

2) Fatal maltreatment- अनुभवलेला घातक दुर्व्यवहार –
अशा व्यक्ती त्यांच्या बालवयात  तशाच वाईट अनुभवातून गेले असतात  किंवा अत्याचारांना (शारिरीक प्रताडणा, लैंगिक छळ) सामोरे गेले असतात.
त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व तसं बनत जातं.  भूतकाळात जे घडलं त्याच प्रतिबिंब वर्तमान अन् भविष्य काळात पडतचं.

3) Unwanted child-  नको असलेलं/लादलेलं मातृत्व-
कुमारी माता ही आपल्या समजासमोर अजूनही एक जटील समस्या आहे.
मग अशावेळी गर्भपातासारखे उपाय सर्रास चालतात.
पण मूल जन्माला आलं तर समाजाच्या भीती पोटी फिलिसाईडल कृत्य घडतात.
तसेच कधीकधी  विवाहित स्त्रीवरही तिला नको असताना मातृत्व लादल्या जातं ज्याला ती मानसिक दृष्ट्या तयार नसतेच.
अशावेळी कधी कधी अशी कृत्ये घडतात.

4) Acutely psychotic-  मनोविकारांनी ग्रस्त-
जर पालका़पैकी एकजण मनोविकारांनी ग्रस्त असेल, जसं नैराश्य, दुभंगलेलं व्यक्तिमत्व, सिजोफ्रेनिया, डिमेनशिया, ओ.सी.डी.( obsessive compulsive disorder) इ.

5) Spousal revenge-  जोडीदाराचा बदला-
सूचना सेठची केस ह्या प्रकारात मोडते.
हा अक्षम्य गुन्हा केलेल्या सूचना सेठने जोडीदाराला शिक्षा द्यावी, त्याला धडा शिकवता यावा म्हणून किंवा त्याचं भावनिक खच्चीकरण करता यावं म्हणून जाणूनबुजून असा गुन्हा केला असावा, असं मानसोपचारतज्ञांचे मत आहे.

आपल्या जोडीदाराबद्दल इतकी घृणा का निर्माण होते की ज्याचे पर्यवसन शेवटी अशा भयंकर कृत्यात व्हावे!!!

गेल्या कित्येक वर्षांपासून घटस्पोटांचं प्रमाण वाढतच आहे

ह्याची कारणं-

* विस्कळीत झालेली कुटुंब व्यवस्था आणि मोडकळीस येत असलेली लग्न संस्था-

आजची स्त्री शिक्षित झाली, ‘चूल आणि मुल’ ह्यात अडकलेली स्त्री उंबऱ्या बाहेर पडली. तिला नवे आकाश खुणावू लागले. उंच भरारी घेणे शक्य होऊ लागले. यशाची अनेक शिखर ती पादाक्रांत करू लागली. स्वतःच्या पायांवर उभी राहिली, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. सारे जग जणू तिच्या मुठीत आले. शिक्षणाने, समाजात वावरल्याने तिच्यात आत्मविश्वास जागृत झाला, स्वतःच्या हक्कांबाबत ती जागृत झाली. पण ह्या सर्व स्वागतार्ह बदलांबरोबर आणखी एक बदल तिच्यात हळूहळू व्हायला लागला तो म्हणजे विधात्याने, निसर्गाने तिच्यावर जे कार्य सोपवलं आहे त्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलला. असं नाही की तिने ह्या गोष्टींकडे कानाडोळा केला किंवा ते नाकारलं पण त्यामुळे तिच्या मनाची स्थिती दोलायमान झाली, तिच्या मनात द्वंद्व सुरू झालं. घर/मुलं की कार्यक्षेत्र!!!

बाहेरच्या जगात अनेक नवनवीन संधी तिला खुणावत होत्या पण चूल आणि मुल या बंधनात ती जखडल्या जात होती. ह्यात काही स्त्रिया यशस्वी झाल्या.दोन्ही गोष्टींचा त्यांनी सुंदर मेळ साधला पण बहुतांश स्त्रियांना मात्र मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागलं किंवा लागतं आहे…’स्व’ची भावना अधिकच दृढ व्हायला लागली. करियरकरता लग्नाचे वय पुढे ढकलले जाऊ लागले. वय वाढल्यावर तडजोड करून लग्न व्हायला लागले.  वय वाढल्याने एकमेकांबरोबर जुळवून घेण्याची भावना कमी व्हायला लागली.  स्वभावातला लवचकीपणा  (flexibility) कमी व्हायला लागला.नंतर  करियर करता तर कधी वय वाढल्यामुळे अपत्य प्राप्ती दुरावत गेली.

पण मूल झाल्यावर तर परिस्थिती आणखीनच बिकट व्हायला लागली कारण मुलाकरता त्याग कोण करणार??? आपलं कार्यक्षेत्र, आपलं यश, आपलं समाजातलं स्थान ह्यांचा त्याग करायला दोघांपैकी कोणीही तयार नाही. ह्यावर पर्याय म्हणून मुलं आयाच्या (मेडच्या) भरोशावर ठेवण्याचा तर कधी पाळणाघरात ठेवण्याचा पर्याय शोधला जावू लागला.

एकत्र कुटुंब पद्धती लयास जाऊ लागली त्यामुळे सुबत्ता, पैसा भरपूर पण मुलांसाठी वेळ नाही, घरी कोणी वडिलधारी माणसं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातून उद्भवणाऱ्या मुलांच्या समस्या़ंबाबत तर वेगळं सांगायला नकोच.घरात ताणतणाव वाढायला लागलेत. दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन, नात्यांमधे दुरावे येऊन लग्न संस्था हळूहळू मोडकळीस येऊ लागली.ह्यामुळे निर्माण होणारी असुरक्षिततेची, अपराधीपणाची भावना स्त्रीमध्ये घर करायला लागली. दोन्ही दगडींवर पाय ठेवण्यासाठी चाललेली तिची  तारेवरची कसरत, घालमेल, आटापिटा ह्यामुळे तिचे मानसिक स्वास्थ्य ऐरणीवर आले.

* बहुतांश महत्त्वाकांक्षी स्त्रियांना तर मूल म्हणजे त्यांच्या विकासातला अडथळा, पायातली बेडी वाटायला लागली.

*
नात्यातला कडवटपणा,  कार्यक्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, दोलयमान  परिस्थिती, अपराधीपणाची, असुरक्षिततेची भावना ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे स्त्रीचं बिघडलेलं मानसिक, शारिरीक स्वास्थ्य.

* पण ह्याला फक्त  स्त्री जबाबदार आहे का?
टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.नाण्याला दुसरी बाजूही असतेच.

* फार पूर्वीपासून जगात सगळीकडे पुरूषप्रधान संस्कृती रूजलेली आहे.पुरूषी वर्चस्वाखाली स्त्रीची पिढ्यानपिढ्या घुसमट होतेच आहे, अन्याय होतो आहे.पुरूष कितीही सुशिक्षित झाला तरी पुरूषत्वाची भावना त्याच्यात प्रबळ असतेच.बहुतांश पुरुष आपल्यापेक्षा यशस्वी जोडीदार पचवू शकत नाही. त्यांचा इगो दुखावला जातो.जोडीदार शिकलेला, कमावता तर हवा असतो पण तिने ( पत्नीने) त्याचबरोबर घरातली सगळी कर्तव्ये पार पाडलीच पाहिजे असा दबाव, अपेक्षा असतेच. मूलं सांभाळणं हे तर स्त्रीचं काम, असा शिक्कामोर्तब केला जातो.त्यामुळे स्त्री नोकरी आणि घर ह्यात पिचून जाते.कधी तिचा हुंड्याकरता छळ केल्या जातो, पिळवणूक, शारिरीक अत्याचार तर कधी घरी/ कार्यक्षेत्राच्या ठिकाणी तिला लैंगिक अत्याचारांना तोंड द्यावे लागतं.

पुरुषी वर्चस्व असलेल्या जगामध्ये अजूनही स्त्रियांना दुय्यम स्थान दिल्या जाते, मग ती कितीही सुशिक्षित असो! तिला बरेचदा अपमानास्पद वागणूक दिल्या जाते मग ती घरी असो किंवा बाहेर कार्यक्षेत्राच्या ठिकाणी असो… ह्या सगळ्याचा परिणाम तिचं मानसिक खच्चीकरण करण्यातहोतो.

मानसशास्त्रानुसार  जिथे  कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घडते किंवा सीमारेषा ओलांडते तेव्हा त्याचं पर्यवसन विरोधात, बंडात होतं.पिढ्यानपिढ्या दाबल्या गेलेला  स्त्रीचा आवाज आता ब़ंड करून उठतो आहे. ती आता जाब विचारते, परखड बोलते. दोघेही माघार घ्यायला तयार नसतात. तसही नव्या पिढीमधे  सहनशक्तिचा अभावच आहे. मग ती स्त्री असो वा पुरूष! ह्याचं पर्यवसन म्हणजे नात्यात येणारा कडवटपणा , दुरावा…

  • घटस्फोटांमुळे केवळ घर दुभंगत नाहीत तर मनं पण दुभांतात, मनावर खोल जखम होते, आतल्या आत प्रचंड पडझड होते. जोडीदाराबद्दल कडवटपणा, तिरस्कार निर्माण होतो.

सूचना सेठ ही बंगळुरूच्या ज्या सोसायटीत रहायची तिथले शेजारी आणि सोसायटी अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, सूचना मुलावर जीव ओवाळून टाकायची. लोक तिचे नाव घेत असत आणि एकटी आई असूनही ती आपल्या मुलाची किती चांगल्या प्रकारे काळजी घेते याचे दाखले द्यायचे.
सूचना सेठ एक स्त्री आहे, आई आहे. तिच्यातही वात्सल्य भावना असणारचं, स्वतःच्या मुलावर अत्यंतिक प्रेम असणारच. मग तरीही तिरस्कारातूनसूडाची, तिरस्काराची भावना एवढी प्रबळ व्हावी की, मनावरचा ताबा सुटावा, सारासार विचार करण्याची बुद्धी भ्रष्ट व्हावी! अन् रागाच्या भरात असे कृत्य घडावे ? काय फायदा त्या सुशिक्षितपणाचा, हुशारीचा जे आपल्याला शहाणपण शिकवू शकत नाही, मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.

कारणं काहीही असोत पण जे घडलं ते अत्यंत भयंकर, आई- मुलाच्या नात्याला काळिमा फासणारं होतं. ते समर्थनीय नक्की नाहीच…काळजी करण्याची गोष्ट ही आहे की, हळूहळू ह्याचं प्रमाण वाढतं आहे‌, म्हणून वेळीच सतर्क होणं जरूरी आहे.

म्हणून नात्यांमधे कडवटपणा येत असेल तर एकमेकांच्या सहकार्याने , ज्येष्ठांच्या मदतीने, प्रसंगी मॅरेज काऊनसिलरची (marriage councellors) मदत घेऊन दुभंगणारी नाती वाचवावीत.
स्वतःचा इगो, अहम् बाजूला ठेवून, एकमेकांच्या मानसिक, शारिरीक स्वास्थ्याची काळजी घेत दोघही जेव्हा सर्वार्थाने एक होतील तेव्हांच संसार सुखाचा होईल हे वेगळे सांगायला नको. आणि अशा घरातून  एक जबाबदार, संतुलित व्यक्तिमत्वचा धनी असलेलं, नात्यांना जपणाऱं, माणुसकी असलेलं, सुसंस्कारित असं पिल्लू  आकाशी झेप घेईल आणि देशाचं, मानवतेचं हित साधेल हे नक्की…

अन् माता न तू वैरिणी‘… असं म्हणण्याची वेळच येणार नाही

डॉ. सुमेधा मनीष हर्षे
9922477041

 

Latest Posts

Don't Miss