कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
| TOR News Network | नागपूर. (Kunal Raut Got Two days Police Custody): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासण्याचं प्रकरण युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांच्या चांगलंच अंगलट येत असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाने कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासून विद्रुपीकरण केल्या प्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यानंतर सोमवारी राऊतांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने कोणताही दिलासा न देता दोन दिवस पोलिस कोठडीत वाढ केली आहे
तिकडे भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या समोरील मार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासण्याच्या प्रकरणासोबतच जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय पुस्तकात सुनील केदार यांचा फोटो छापल्यावरूनही भाजपनं काँग्रेसला चांगलेच धारेवर धरलं आहे.
कोण आहे कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास सुरूवात केली. एनएसयूआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते निवडून आले. युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून निवडून आले.