उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची परिषदेत टोलेबाजी
Devendra Fadnavis Statement In Winter Assembly 2023 :राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. काही विविध मुद्द्यांवर आक्रमक असणारे सत्ताधारी व विरोधक काही प्रसंगी मिश्किल टिप्पणी, कोपरखळ्या, टोले मारतानाही दिसून आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत अशीच टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला. काय म्हणाले फडणवीस… (DCM Devendra Fadnavis share Light Moments In Vidhan Parishad On Cm Post in BJP)
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत सविस्तर भाषण केलं. यावेळी विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले नसल्याचं म्हणत विरोधी पक्षांवर टीका केली. मात्र त्याचवेळी भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी तो मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांचे आपण आभार मानत असल्याचं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, फडणवीसांनी प्रविण दरेकरांचं कौतुक केल्यानंतर समोरच्या बाकांवरून काही विरोधी पक्ष आमदारांनी “आता त्यांना मंत्री करा” म्हणत देवेंद्र फडणवीसांना कोपरखळी मारली. त्यापाठोपाठ फडणवीसांनी टोलेबाजी केली!
“आमच्या पक्षात मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो. एक लक्षात ठेवा. आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची. हरएक के अच्छे दिन आएंगे”, असं फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
एकीकडे फडणवीस सगळ्यांनी आशा ठेवावी असं म्हणत असताना त्यांच्यामागे बसलेले मंत्री गिरीश महाजन यांनी लागलीच “सीनिअर लोकांनीही आशा ठेवावी का?” असा प्रश्न बसल्या-बसल्याच विचारला. त्यावरही फडणवीसांनी टोला लगावताना “गिरीशभाऊ म्हणतायत सीनिअर लोकांनी पण आशा ठेवायची का? आपण सीनिअर लोकांचा स्कोप थोडा कमी केलाय”, असं म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला!