Mumbai Indians News : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्या याची निवड करण्यात आली आहे. २०२४ मध्ये तो संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारेल. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाकडून सोशल माध्यमावर याबाबतची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने त्यांचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर झाला. मीडिया रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील 1.5 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. (Mumbai Indians lost around 1.5 Lakh followers today after the announcement)
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मागील दोन मोसमात गुजरात टायटन्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. दोन्ही वेळा त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होताना विजेता होण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर या वर्षी उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावे लागले. हार्दिक पंड्यामधील नेतृत्वगुण हेरून मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझी व व्यवस्थापनाने त्याला संघात समाविष्ट करण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या प्रयत्नामुळे हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघाकडून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघात समाविष्ट झाला. दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. मात्र हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्याचे कारण मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले की, आम्हाला भविष्यातील संघ घडवायचा आहे. त्यामुळे नेतृत्वबदल करण्यात आलेला आहे. दरम्यान, रोहित शर्माला आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळावे लागणार आहे. २०२४ मोसम त्याचा अखेरचा असण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० खेळणार?
रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट तो खेळणार का, असा प्रश्न याप्रसंगी निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच रोहित शर्माने पुनरागमनाचे संकेतही दिले. एकदिवसीय विश्वकरंडक लांबणीवर आहे. त्यामुळे सध्या तरी त्याने टी-२० विश्वकरंडकाबाबत मत व्यक्त केले, असे म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्षात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये खेळणार की नाही, याबाबत काहीच सांगितलेले नाही.