संघातून वगळण्याच्या बीसीसीआयच्या धोरणांवर केली टीका
Ajay Jadeja on Indian Cricket System: भारताच्या युवा संघाने अलीकडेच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ ने पराभव केला. या विजयाने चाहते कमालीचे आनंदित असतानाच माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने भारतीय क्रिकेटमधील संघातील खेळाडूंची निवड आणि संघातून वगळण्याच्या बीसीसीआयच्या धोरणांवर जोरदार टीका केली. (Ajay Jadeja Angry Over The Exclusion Of Ishan Kishan From Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन टी-२० सामन्यांनंतर इशान किशनचे नाव प्लेइंग-११ मधून गायब असल्याचे पाहून जडेजाला आश्चर्य वाटले.
वास्तविक, इशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तीन सामन्यांमध्ये ३६.६७च्या सरासरीने आणि १४४.७४च्या स्ट्राइक रेटने ११० धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. इशानने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात खराब फलंदाजी आणि यष्टिरक्षणानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग-११ मधून वगळले. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या जागी जितेश शर्मा खेळला. नॅशनल क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली होती.
इशान किशनला विश्वचषकात फक्त दोन सामन्यात खेळवले होते. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यानंतर इशानला बाकावर बसवल्यामुळे अजय जडेजा प्रचंड संतापला होता. इशानला आयसीसी विश्वचषक स्पर्धेत केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. जडेजा म्हणाला, “भारतीय क्रिकेटमध्ये बाहेर बसवणे खूप सोपे आहे. निवडीचा फारसा विचार कोणी करत नाही. इथे रिजेक्शन आहे, सिलेक्शन नाही आणि हे अनेक दशकांपासून सुरु आहे. आम्ही नुकतीच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. इशान किशनला केवळ तीन सामने मिळाले. मला तो खेळाडू आवडतो कारण, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.”