वेस्टर्न कोल फित्ड इंडियाची चमू उत्तरकाशीत दाखल
Uttarkashi Tunnel Latest News : गेल्या १५ दिवसांपासून उत्तराखंडाच्या उत्तरकाशीत झालेल्या भूस्खलनाने बोगद्यात पंधरवड्यापासून अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका लांबली आहे. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणलेली ऑगर मशिनही कुचकामी ठरत आहेत. मजुरांच्या सुटकेसाठी व्हर्टिकल खोदकाम सुरू असून त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड नागपूरची चमू सिलक्यारा येथे दाखल झाली आहे.(Nagpur Western Coal Limited team will help to lift out the 41 trapped workers from Silkyara-Barkot tunnel) व्हर्टिकल ड्रीलिंगनंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या कॅप्सूलचे काम नागपूरवरून आलेली कोल इंडियाची चमू करणार आहे. यात चार तंत्रज्ज्ञांचा समावेश आहे.
गेल्या १५ दिवसापासून सुरू असलेल्या रेस्क्यू चमूला त्यामुळे थांबून थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे. देशातील अन्य भागातून पाठविलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिलक्यारा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे आता आडव्या मार्गाने पाइप टाकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरून व्हर्टिकल ड्रिलिंगही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना बाहेर येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे. चारधाम यात्रेसाठी बारमाही रस्ता बनविण्याच्या योजनेतील सिलक्यारा बोगद्यात ४१ मजूर पंधरवड्यापासून जीवन मरणाशी संघर्ष करीत आहे. या मजुरांना काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र, ते प्रयत्न विफल ठरत आहेत. ड्रिलिंग मशिन वारंवार बंद पडत आहे. मजुरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत. मजुरांना बाहेर काढण्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग देखील केली जात आहे. सोमवारी सकाळपासून मॅन्युअल एस्केप टनेल बनविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी नागपूरहून कोल इंडियाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे.