24 डिसेंबरनंतर सरकारला एक दिवसही देणार नाही
Maratha Andolan Latest News: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी राज्याचा दौरा सुरु केला आहे. त्यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकाला 24 डिसेंबर ही अखेरची तारीख दिली आहे. मागण्या मान्या झाल्या नाही तर ते या शहरात विशाल आंदोलन करणार आहेत. (Manoj Jarange Patil Announcement For Huge Protest)
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहे. घेतलेल्या सभांनाही तुफान गर्दी होत आहे.आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिसेंबर ही मुदत दिली आहे. मराठा समाजाला या तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन जालन्यात नाही तर मुंबईत सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 24 डिसेंबरनंतर सरकारला एक दिवसही मिळणार नाही. 25 डिसेंबर रोजी आपण आपली भूमिका जाहीर करु, असे त्यांनी म्हटले आहे.ते म्हणाले 24 डिसेंबरपर्यंत सरकार काय करते हे आम्ही बघत आहोत. आरक्षण बाबत निर्णय घेतला नाही तर 25 तारखेला बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. तशी वेळ येणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे. परंतु वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारला कायदा पारीत करावा लागत असेल तर त्याला आधार पाहिजे आणि आता कुणबी नोंदी लाखांत सापडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात काहीच अडचण नाही. सरकारवर माझा विश्वास आहे आणि नाही तर लढायला सज्ज आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.