Best Marathi Blog 2023: प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना किती भिन्न भिन्न असतात ! जाणतेपणापासून अर्थात परावलंबित्वाचा काळ वगळता प्रत्येकाची धडपड सुखासाठीच चाललेली असते.कुणाला इतरांसाठी कष्टण्यात सुख,कुणाला इतरांच्या जगण्यात आनंद निर्माण करण्यात सुख,कुणी उदारवंत अडल्या-नडल्यांना मदत करण्यात मानतात सुख तर कुणाला संपत्ती जमवण्यात सुख.कुणाला मान,सन्मान,प्रतिष्ठा हवी असते.सुख -दुःख हातात हात घालूनच असतात भवताल उभे.आपल्या कृती-कर्तव्यातून किती थारा देतो आपण कुणाला त्यावर अवलंबून असते त्यांचे आपल्या आयुष्यात येणे तर काही सुखदुःखे असतात नियतप्रणित.
जे लोक आपल्या समाजाचे,संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण करतात,जे समकाळातल्या सूर हरवलेल्या चराचरातील जगण्याच्या तळाशी पोहोचतात त्या कलावंतांचे जग फार वेगळे असते. कलेत पारंगत होण्यासाठी त्यांना साधना करावी लागते.कोणतीही गोष्ट कुणालाच सहजासहजी लाभत नाही.कलावंताला लाभलेल्या सृजनतेला अधिक सुंदर करण्यासाठी तपश्चरण करावे लागते.त्यानंतर पडते थोडेफार त्याच्या पदरात त्याच्या साधनेचे फळ.त्याच्या मनाजोगी झालेली त्याची निर्मिती म्हणजे त्यांचे सुख.
सामान्यांचे जग वेगळे असते.भौतिकात सुख शोधणारी सामान्य माणसे आपल्या कुटुंबीयांसाठी धडपडतात.त्याचाही परीघ असतो अत्यंत मर्यादित.घर,नोकरी-व्यवसाय,चांगला सहचर,मुलबाळं हीच असते सर्वसाधारण माणसाची सुखाची अपेक्षा.
मी तरी कुठे अपवाद याला ! मीही केली सुखासाठी हीच धडपड. सुस्वभावी,कमावता जोडीदार,संसारवेलीला फुल,नोकरी,घर,आपली म्हणता येतील अशी माणसं,प्रेम-जिव्हाळा-आपुलकी-मैत्र सारा गोतावळा जमवला भवताल.मिळालं मनाजोगं सर्वकाही.पण शांती…स्वस्थता कुठे ? मनाचे ध्यास तर वेगळेच…लौकिकापल्याड धाव त्याची…
एक छोटासा माझ्या आत दडलेला कलावंत मला स्वस्थ बसू देत नाही. जागेपणी,निद्रेत ध्यासांची नुसती आवर्तनं…एक हातावेगळं झालं की दुसरंच काहीतरी.ध्यासाला अंत नाहीच.छोट्याशा रोपट्याला नवांकुर येऊन त्यावर कळी दिसायला लागते,त्या कळीचं फुलात रूपांतर होईपर्यंतचा काळ शांतपणे,संयमाने अनुभवायचा.निसर्गनियमाप्रमाणे उत्तमाकडे जाण्यासाठी हवा असतो अवकाश. हवे असतात परिश्रम,हवी असते साधना.तेव्हाच तर गाणारा गळा सुरेल होतो,शिल्प अधिक कोरीव,कातिव होतं,वाणीला धार येते आणि लेखणीला येते सकसता.
“आधी देऊन मग घेतले“ तर घेण्याला अर्थ येतो,चहुबाजुंनी सकारात्म आशीषाचे झरे झुळझुळत येतात.त्याचा शब्दातीत आनंद मी अनुभवतेय.भवताल जिव्हाळ्याची माणसं शब्दांना भरभरून प्रतिसाद देतात, त्यांच्या काळजातली ओल कायम जबाबदारीनं लिहीतं राहण्याचे बळ पुरविते.सुसंवादातून हे नातं इतकं दाट झालेलं असतं की, ते शब्दांनी सांगायची गरज भासत नाही.यापेक्षा सुख ते कोणते !
आपल्या आयुष्यात अनेक ऋतू येतात.जेव्हा आपले सुखानंदाच्या झुल्यावर झुलण्याचे दिवस असतात तेव्हा तो आपल्या वाट्याचा श्रावण असतो. सुख,प्रसिद्धी,ध्यासपूर्ती,निर्मिती अशा विविध रंगातून आपल्या व्यक्तित्वाचे इंद्रधनु आपल्या कर्तव्याच्या अवकाशाला सुशोभित करू लागते.श्रावणातले इंद्रधनुष्य तयार व्हायला हवी असते हलकी रिमझिम अन् तिमधून जाणारे सूर्यकिरण ! निखळ,निरामय आनंदाचे कोवळे किरण आणि सुसंवादी माणसांच्या सहवासाच्या सुखद सरी आपल्या आयुष्यात आल्या की,आपल्या अवकाशातील सुखाचे इंद्रधनुष्य आपले आयुष्य समृद्ध करू लागते.यापेक्षा वेगळं काय असू शकतं सुख…!
सुखप्राप्तीचा हा ध्यास संपणारा नाहीच.जीवात जीव असेतोवर वाढणारच. नाही त्याची मागणी. आहे त्यापेक्षा नवे… वेगळे … हवे असते काहीतरी.कधी कधी माझेच सुख मला हिणवू लागते. एका मनात ध्यास तर दुसरा कोपरा ठसठसू लागतो अकल्पित भयाने. हा सुखाने तुडूंब भरलेला आज इतका गुदमरून टाकतो की,आपलीच आपल्या सुखाला नजर लागावी.आज भरलेला हा सुखाचा प्याला कायम राहील ना भरूनच!मनच मनाला खातं नि मग त्या सुखाच्या दिवसातही आपण नाहकच अस्वस्थ होतो,दुःखी होतो,धास्तावून जातो.
नाशिकचे कवी समाधान महाजन यांचा अशात **अस्वस्थ क्षणांचे पाश** कविता संग्रह वाचला.त्यातील बेसावध क्षण कवितेतील ओळी इथे तंतोतंत लागू पडाव्यात–
का कोण जाणे
माझं जगणंच मला
स्वप्नवत वाटतंय
टायटॅनिक बुडण्यापूर्वी
त्यातील बेसावध जीवांना
तरी कुठे माहीत होता पुढचा बेसावध क्षण
हा क्षण तोच तर नाही ना?
मानवी मन फार संशयी.आनंदात न्हाऊन निघत असतानाही नानाविध शंकांनी ग्रासून जातं वेळी-अवेळी.खरंच आपण सांगू शकतो का उद्याच्या दिवसाचं आपल्यासाठीचं उगवणं ? पण म्हणून स्वप्न बघणं थोडीच थांबतं. ध्यासांना कुठला आलाय अंत ? ते तर निरंतर ताजे…टवटवित होत वाहतच राहतात आपल्या नसानसातून,मेंदुतून,कृती-उक्तीतून त्याचं प्रवाहीपण अनुभवण्यातच तर साठवलेलं असतं खरं सुख…!
जगात सदैव सुखी असे कोणीच नाही.
जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूचि शोधूनि पाहे।।
असे समर्थ रामदासांनी यासाठीच म्हटले असावे.परंतु तशी सुखाच्या शोधासाठीच चाललेली असते आयुष्यभर आपली धडपड. ते सापडतं…मुठीत येतं क्षणभर नि वाळूसारखं निसटत जातं चिमटीतून.ते कायम टिकत नाही एका जागी कधीच.हातात हात घालूनच असतात ना ते दोघेही…!म्हणून हाव सोडून मोकळेपणाने आहे त्यात समाधान मानत जगता आलं की,सुखाची दारे आपल्यासाठी किलकिली झाल्याशिवाय रहात नाहीत.निसर्ग नियमाप्रमाणे जे वाट्याला आलं ते स्वीकारत गेलं की,जीवन सुसह्य होते.लॉकडाउनच्या निवांत काळात घरातली जुनी गर्दी कमी करावी म्हणून पुस्तकं चाळत असता दोन हजार सातचा लोकमत दिवाळी अंक हाती आला.अनेक प्रथितयश कवींच्या कवितांनी खचून भरलेल्या त्या अंकातील दत्ता हलसगीकरांच्या ‘अशाश्वताचा झुला’कवितेजवळ थांबले. कवितेचं शेवंटलं कडवं-
हातावरची भाकरी,माठातलं थंड पाणी
जवळ प्रेमाचं माणूस हेच मोठं सुख आहे
अशाश्वताच्या झुल्यावरती सदा झुलत राहणं
स्वतःभोवती कोष विणणं अगदी खोटं आहे
सुखाची कल्पना मनात घोळत असताना नेमकी ही कविता नजरेपुढे आली.
कवीने किती साधी,सोपी पण समर्पक व्याख्या केली आहे सुखाची! सुख म्हणजे तरी काय ?
समाधानाने पोट भरण्याची मिळालेली वा मिळवलेली शाश्वती. भवताल प्रेम जिव्हाळ्याचा म्हणता येईल अशा माणसांचा गोतावळा, आपल्या पायांना जमिनीवर रहावंसं वाटणं, काळजाचा एक कप्पा कायम ओला असणं, शरीर आणि मनाचे स्वास्थ्य, या त्या आनंदात जगवणाऱ्या आणि जगू देणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी बाकी सारा मोहाचा पसारा. हेही हवे तेही हवे करत सतत आणि सतत जे नाही त्याच्या मागे धावत जाणं ‘मी’ ‘माझं’ या परिघात गुंतून डोळ्यावर झापड लावणं म्हणजे अशाश्वताच्या झुल्यावर झुलत राहणं. हे सर्व खोटं आहे हे वेळीच ज्याला कळतं त्याच्याकडे फिरकण्याचं धाडस दुःख तरी कसं करेल? स्वप्नांचे रंगीबेरंगी दिवे एक दिवस मावळून जातात. आपल्या जगण्यावरचा झगमगता वर्खही एक दिवस उडून जातो. अथकपणे सुखामागे धावत जाताना पायही थकतात एक दिवस. कुणालाही नको असतं आपल्यापासून अधिक काही. हवी असते फक्त आपल्यातली माणुसकी. आपल्यापासून प्रेमाचे चार शब्द, हव्या असतात आपल्या निवांत दोन घटका.
वर्तमानाने हे टळटळीत सत्य सिद्ध करून दाखवलं आहे की, शांत स्वस्थ जगण्यासाठी फारच कमी गोष्टी लागतात माणसाला. पण हावरटपणाने सुखाच्या मागे धावता धावता आपली अनावर तहान भागतच नाही कधी. उंच उंच उडणारे पक्षी घरट्यात परततात तेव्हा माणसाचे पाय जमिनीवर असले तरच लाभू शकतं त्याला खरं सुख.
जीवन सुंदर, सुखी करण्यासाठी आवश्यकता असते सकारात्मक विचारांची, निर्व्याज कृतीची. आपण करतो ती प्रत्येकच गोष्ट परतफेडच्या अपेक्षेने केली तर आपण जगण्यातला निर्व्याज आनंद गमावून बसतो. समोरच्या व्यक्तीकडे आपण साशंक नजरेने बघू लागलो तर नितळपण, सौहार्द आपली दृष्टी गमावून बसेल. विजयाताई ब्राह्मणकरांनी सस्नेह भेट दिलेल्या कवयित्री शोभा बडव्यांच्या ‘अंतःस्वर’ संग्रहातील कवितेच्या काही ओळी खूप भावल्या.
असो तेवढेच सुख खरी पशाचीच भुक बोच किरकोळाची का, सारे लाभता घाऊक
मनी मानण्यावरी गं, सौख्य गुणण्यावरी गं टाका निसटता उचलून विणण्यावरी गं
जीवनातील सुख आणि दुःख सहजतेने स्वीकारत गेलो की जगणे सोपे होते आणि मग आपण सुख नावाच्या अशाश्वताच्या झुल्यावर झुलत राहण्याचा नाहक अट्टाहास धरणार नाही कधीच.
लेखिका – मीनल येवले
(वरील लेखामध्ये नोंदविण्यात आलेले मत हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)