Saturday, January 18, 2025

Latest Posts

समृद्धीवरील भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

| TOR News Network |

Samruddhi Mahamarg Jalna Accident : समृद्धी महामार्गावर रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जालना येथे शुक्रवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास दोन कारच्या धडकेत ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की काही मृतदेह हे रस्त्यावर पडलेले पहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत दोन्ही गाड्यांना रस्त्यावरुन बाजूला करत, मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयात हलवले आहेत.

स्विफ्ट डिझायर आणि एर्टिका या दोन गाड्यांची धडक झाल्याची प्राथमिक माहिती कळत आहे. (collision between two cars Near Jalna) यामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीचा क्रमांक (MH 12 MF 1856) असा आहे. एर्टिका गाडीचा क्रमांक (MH 47 BP 5478) असा आहे.

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. स्विफ्ट गाडीने धडक दिल्यामुळे एर्टिका गाडी ही महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. (Ertiga Desire Car Accident near jalna)

पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही गाडी वर काढण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान या अपघातात ४  जण गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमींपैकी तिघांची ओळख पटलेली आहे. अल्ताफ मन्सूरी, शकील मन्सूरी आणि राजेश अशी तीन जखमींची नाव आहेत.

दरम्यान रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss