•   Saturday, August 16
पश्चिम महाराष्ट्र

प्रदूषण मुक्त पुण्यासाठी इथेनॉल प्लॅन, या दृतगती मार्गाची गडकरी यांची घोषणा

पुणे : केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २४) पुण्यात नव्या पुणे-बेंगळरु द्रुतगती मार्गाची घोषणा करीत पुणेकरांना नवी भेट दिली आहे. यासोबतच वाघोली ते शिरुर महामार्गही तीन मजली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. . पुण्यात आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातल्या उड्डाण पुलाचे भूमीपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.  

प्रदूषण मुक्त पुण्यासाठी केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इथेनॉल प्लॅन (ethanol plan) घोषित केला आहे. ते म्हणाले, पुणे मेट्रो कामाच्यावेळी लोकांनी माझ्यावर बरीच टीका केली. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही आणि नागपूरचे काम बरंच पुढे गेले. तेव्हा पुण्यातल्या लोकांनी माझ्यावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका केली. त्यावेळी मी पुण्यात आलो होतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. पुण्यात मेट्रो अंडरग्राऊंड किंवा वरून करायची यावर चर्चा झाली. तेव्हा मी म्हटले जेवढा खर्च जास्त करू तेवढे तिकिटाचे दर वाढतील. त्यामुळे मेट्रो वरूनच करण्याचा निर्णय झाला, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, मेट्रो प्रवासामुळे वेळ, पैशांची बचत होऊ शकते. त्यामुळे एसटीच्या तिकिट दरात पुणे ते कोल्हापूर मेट्रो प्रवास शक्य आहे. पुढील काळात हा मेट्रो मार्ग होऊ शकेल, असे प्रतिपादन नितीन गडकरी  यांनी केले. आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी मेट्रो हाच आपल्याकडे पर्याय आहे. त्यामुळे पुण्याला जोडणारी शहरे मेट्रोच्या जाळ्याने जोडली पाहिजेत, असे ते म्हणाले. 

नदी विकास प्रकल्पाच्या कामाबद्दल गडकरी यांनी एक आठवण सांगितली. पुण्यातील नदी विकास प्रकल्प जवळपास 1400 कोटींचा आहे. ( Pune River Linkage Project) त्या प्रकल्पावर दिल्लीत चर्चा झाली. पण तो अडकून पडला होता. तेव्हा शेतकरी जसे बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसे सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिले, तर त्याचंच काम होते. बाकीच्यांचं होत नाही. त्या वेळी मी सचिवांना या कामाचे तातडीने कंत्राट काढण्याचे निर्देश दिले. आता जायकाचे 1400 कोटींचे टेंडर निघाले आहेत आणि काम देखील सुरू झाले आहे. 

राज्यातल्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सिंहगड रोडवरील पूल खरंतर 18 लेनचा व्हायला हवा होता मात्र ते शक्य नाही, अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली. मात्र नगररोडवरील वाघोली ते शिरूर रस्ता तीन मजली करणार आहोत, असे गडकरी यांनी जाहीर केले आहे. तळेगाव ते नगर रस्ताही तीन मजली बनवण्याचे ते म्हणाले. मात्र राज्य सरकारने जीएसटी माफ करावा, अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली.